झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी, प्रकरणाचे धागेदोरे विदेशात
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना विदेशातून जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या तपासात जर्मनीच्या सर्व्हरहून ही धमकी आल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.
रांची : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना विदेशातून जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या तपासात जर्मनीच्या सर्व्हरहून ही धमकी आल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आता विदेशात असल्याने सीआयडीचे सायबर विभाग इंटरपोलची मदत घेणार आहे. यासाठी सायबर अधिकाऱ्यांनी कोर्टात इंटोरपोलच्या मदतीसाठी अर्ज केला आहे. कोर्टाच्या आदेशानंतर या प्रकरणी आंतरराष्ट्रीय पोलीस एजन्सी असलेल्या इंटरपोलकडून तपासासाठी मदत घेतली जाईल.
नेमकं प्रकरण काय?
हेमंतर सोरेन यांना एक महिन्यापूर्वी म्हणजेच जुलै महिन्यात ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्याचबरोबर आरोपींनी गेल्यावर्षी 8 आणि 17 जुलैला ई-मेलद्वारे धमकी दिली होती. याप्रकरणी रांचीच्या सायबर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. दोन्ही मेलसाठी जर्मनी आणि स्वित्झर्लंडच्या वेगवेगळ्या सर्व्हरचा वापर करण्यात आला आहे.
धमकीचा सर्वात पहिला मेल हा 8 जुलै 2020 रोजी मुख्यमंत्री सचिवालयात आला होता. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांना उडवून देऊ, अशा प्रकारची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी 13 जुलै 2020 रोजी स्पेशल ब्रांत इन्सपेक्टरच्या जबाबानुसार एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर 17 जुलै 2020 रोजी पुन्हा मेलद्वारे धमकी देण्यात आली होती.
इंटरपोलकडून महत्त्वपूर्ण माहिती मिळवली जाणार
ज्या सर्व्हरचा वापर करुन मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना धमकी दिली गेली ते जर्मनीच्या कंपनीचं सर्व्हर असल्याची माहिती सीआयडीच्या सायबर विभागाने केलेल्या तपासात समोर आली आहे. या प्रकरणाचा संबंध आता विदेशासी संबंधित असल्याने आता पोलीस इंटरपोलच्या मदतीने सर्व्हरकडून आयपी अॅड्रेससह इतर माहिती गोळा करणार आहे.
महाराष्ट्रात आमदार प्रसाद लाड यांना धमकीचे फोन
दुसरीकडे महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी आमदार प्रसाद लाड यांनी आपल्याला जीवे मारण्याच्या धमकीचे फोन आल्याचा दावा केला होता. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेत झालेल्या राड्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांना धमकीचे फोन आले होते. अज्ञात नंबरवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, असं भाजप आमदार प्रसाद लाड यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं. मुंबईच्या सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचं देखील प्रसाद लाड यांनी सांगितलं होतं. तसंच असल्या धमक्यांना मी घाबरत नाही, जशास तसं उत्तर देण्यास तयार असल्याचं लाड म्हणाले होते.
प्रसाद लाड काय म्हणाले?
“रात्री 2 वाजून 51 मिनिटांपासून मला धमकीचे फोन यायला सुरु झाले, जे अद्याप चालू आहेत. मला एक नाहीतर मला अनेक धमकीचे फोन आलेले आहेत. अज्ञात नंबरवरुन हे फोन येत आहेत. फोनमधील व्यक्ती अर्वाच्या भाषेत शिवीगाळ करुन मला जीवे मारण्याची धमकी देत आहेत. वाईट पद्धतीने मेसेज टाकत आहेत.”
“मी आताच सायन पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसोबत बोललो. मी त्यांना पत्र लिहिलं आहे. तसंच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना देखील याविषयी मी पत्र लिहिणार आहे आणि हा सगळा विषय त्यांना अवगत करणार आहे.”
“काही दिवसांपूर्वी मला सचिन वाझेकरवी सुपारी होती. सचिन वाझेकडे अग्रवाल नावाच्या व्यक्तीने तशा पद्धतीचं स्टेटमेंट दिलं होतं. त्यामुळे माझ्या जीवाला सातत्याने धोका वाढतोय. पण अशा धमक्यांना मी एक तरुण म्हणून, मराठी आमदार म्हणून मी भीक घालत नाही. अशा धमक्यांना मी जशास तसं उत्तर देईन”, असं प्रसाद लाड म्हणाले होते.
हेही वाचा :
निवृत्त रेल्वे अभियंत्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले, राहत्या घरात गळा दाबून झालेली हत्या
19 वर्षीय तरुणीच्या सोनोग्राफीचा बहाणा, बीडमधील ‘नगराध्यक्ष’ डॉक्टरने अश्लील चाळे केल्याचा आरोप