जिथे काम करतो तिथेच घृणास्पद कृत्य, सहकाऱ्यालाही फसवलं, कंपनीला कोट्यवधींचा चुना, पुण्यातील धक्कादायक घटना
काही माणसं खरंच खूप भोळे आणि साधे असतात. ते सर्वांशी साधेपणाने वागतात. पण त्यांचा साधेपणाचा काही लोक गैरवापर करुन घेतात. तसाच काहीसा प्रकार पुण्यातून समोर आला आहे.
पुणे : काही माणसं खरंच खूप भोळे आणि साधे असतात. ते सर्वांशी साधेपणाने वागतात. पण त्यांचा साधेपणाचा काही लोक गैरवापर करुन घेतात. तसाच काहीसा प्रकार पुण्यातून समोर आला आहे. पुण्यातील आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या एका साध्या कर्मचाऱ्याला त्याच्याच सहकाऱ्याने फसवलं आहे. विशेष म्हणजे त्याने फक्त सहकाऱ्यालाच नाही तर त्याचं नाव घेऊन थेट कंपनीलाच कोट्यवधी रुपयांचा चुना लावला आहे. अखेर आरोपीच्या कृत्याचं बिंग फुटलं असून तो आता जेलची हवा खातोय.
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील एका आंतरराष्ट्रीय कंपनीत 41 वर्षीय राहुल कौल काम करतात. त्यांना त्यांच्याच सहकाऱ्याने धोका दिला आहे. त्यांच्या नावाचा म्हणजेच त्यांना अंधारात ठेवून त्यांच्या लॉग इन आयडीचा वापर करुन त्यांच्या एका सहकाऱ्याने कंपनीतील तब्बल 3 कोटी 68 लाख रुपयांचा अपहार केला. राहुल यांच्या या सहकाऱ्याचं आदित्य लोंढे असं नाव आहे. संबंधित प्रकरण राहुल यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपीचं बिंग फुटलं.
आरोपी आदित्य लोंढे याने आपल्या सहकारी कर्मचाऱ्याचं लॉग इन आयडी वापरुन कंपनीतील कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारला. त्याने जवळपास 24 गैरव्यवहार केले. विशेष म्हणजे त्याने अपहाराची रक्कम परदेशातील बँकेत वळवले होते. त्यानंतर तिथून आपल्या बँक खात्यात वळवले. या कामात त्याला कार्थिक नावाच्या आरोपीने देखील साथ दिला. कार्थिक याने आदित्यच्या खात्यात 2 कोटी 37 लाख 87 हजार रुपये पाठवल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
आरोपीने एवढ्या पैशांचं नेमकं काय केलं?
आरोपीने एकूण 3 कोटी 68 लाख रुपयांचा घोटाळा केला होता. एवढ्या पैशांचं त्याने काय केलं असेल? असा प्रश्न पोलिसांनाही पडला होता. त्याचं उत्तरही पोलिसांना मिळालं. आरोपीने अलिशान कार, फ्लॅट आणि दागिने खरेदी केले होते. विशेष म्हणजे त्याने बीएमडब्ल्यू कार खरेदी केली होती. पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळत त्याच्या जवळून महागडे मोबाईल, लॅपटॉप आणि कार असा 34 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीला कोर्टात हजर केले असता 6 सप्टेंबरपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
साधं राहणं चूक नाही, पण सतर्क राहणं जरुरीचं
या प्रकरणातून एक गोष्ट लक्षात येते की आपण सतर्क राहिलं पाहिजे. आपल्या स्वभावाचा कुणी गैरवापर करु नये, असा धडा यातून शिकायला मिळतो. आपण साधे-भोळे असणं यात काहीच गैर नाही. तो आपला नैसर्गिक स्वभाव आहे. त्यामुळे काही माणसं आपल्या स्वभावाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतात. पण साधेपणासोबत सतर्कही राहायला हवं. अन्यथा संबंधित घटनेसारख्या गोष्टी घडतात. तसेच आरोपी आदित्य लोंढे सारखे लोक हे फक्त गुन्हेगार नाही तर ती एक वृत्ती आहे. अशा लोकांपासून नेहमी सावध राहिलेलं चांगलं. कारण अशी माणसं आपल्याला कधी धोका देतील याचा भरोसा नाही. त्यामुळे सतर्क राहावं.
हेही वाचा :
आधी पप्पांना गाडीने उडवलं सांगितलं, नंतर वडिलांच्या हत्येची कबुली, तरुणाने असं का केलं?