बॉलिवूड अभिनेत्रीच्या घरात दरोडा, ओलीस ठेवून साडेसहा लाखांची लूट
तीन दरोडेखोरांपैकी एकाने तिचे एटीएम कार्ड घेतले आणि 50 हजार रुपये काढून परत केले. तोपर्यंत इतर दोघं तिच्यावर नजर ठेवून होते, अशी माहिती अभिनेत्री अलंकृता सहाय हिने पोलिसांना दिली
नवी दिल्ली : मॉडेल-अभिनेत्री अलंकृता सहायला (Alankrita Sahai) घरात ओलीस ठेवून चाकूच्या धाकाने तिची लूट केल्याची घटना दिल्लीत उघडकीस आली आहे. सेक्टर -27 मधील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ती भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहते. मंगळवारी दुपारी तीन अज्ञात मुखवटेधारी चोरांनी तिच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. त्यानंतर अलंकृताला ओलीस ठेवून चाकूच्या धाकाने 6.50 लाख रुपये लुटण्यात आल्याचा आरोप आहे. भीतीने तिने स्वतःला वॉशरूममध्ये बंद केले होते.
नेमकं काय घडलं?
अलंकृता सहायने काही दिवसांपूर्वी खरार येथून फर्निचर खरेदी केले होते. त्यापैकी काही वस्तू रविवारी तिच्या भाड्याच्या निवासस्थानी डिलीव्हर करण्यात आल्या होत्या. दरोडेखोरांपैकी एक जण तिच्या घरी फर्निचर देताना आला होता, असा तिला संशय आहे. तिने पोलिसांना असेही सांगितले की, तीन दरोडेखोरांपैकी एकाने तिचे एटीएम कार्ड घेतले आणि 50 हजार रुपये काढून परत केले. तोपर्यंत इतर दोघं तिच्यावर नजर ठेवून होते.
अलंकृताने मदतीसाठी आरडाओरड केली असता दरोडेखोरांनी बाल्कनीतून उडी मारून पळ काढला. पळून जाण्यापूर्वी ते आधी पहिल्या मजल्यावरील बाल्कनीवर आणि नंतर तळमजल्यावर उतरले. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरही भाडेकरू होते.
कोण आहे अलंकृता सहाय?
27 वर्षीय अलंकृता सहाय ही सुपरमॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिने मिस इंडिया अर्थ 2014 (Miss India Earth 2014) हा किताब पटकावला आहे फिलिपिन्समध्ये झालेल्या मिस अर्थ स्पर्धेत सात टायटल्स जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली आहे नेटफ्लिक्सवरील लव्ह पर स्क्वेअर फीट या रोमँटिक कॉमेडी सिनेमामध्ये ती झळकली होती. विपुल शाहांच्या नमस्ते इंग्लंड या बॉलिवूड चित्रपटातही तिने भूमिका साकारली आहे. याशिवाय अनेक म्युझिक व्हिडीओंमध्येही अलंकृताने काम केलं आहे.
संशयित सीसीटीव्हीत कैद
एसपी (शहर) केतन बन्सल, डीएसपी (पूर्व) गुरमुख सिंह, इन्स्पेक्टर जसबीर सिंग, गुन्हे शाखेचे निरीक्षक हरिंदरसिंग सेखोन आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सूत्रांनी सांगितले की संशयित परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
“पीडित मुलगी फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित आहे. ती घरात एकटी होती. मुख्य दरवाजा उघडा होता. दरोडेखोरांनी जबरदस्तीने प्रवेश केला आणि पीडितेला चाकूच्या धाकावर लुटले. आम्ही गुन्हा दाखल केला आहे आणि महत्त्वाची माहितीही मिळाली आहे” अशी माहिती एसपी बन्सल यांनी दिली.
फर्निचर डिलीव्हरी बॉयसोबत वादावादी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “अलंकृताने पोलिसांना तक्रार दिली की तिने दिल्लीमध्ये राहणाऱ्या तिच्या पालकांसाठी फ्लॅट भाड्याने घेतला आहे. ते दोन-तीन दिवसात येथे येणार होते. रविवारी फर्निचर घेऊन आलेल्या एका व्यक्तीसोबत तिची शाब्दिक चकमक उडाली होती.” फर्निचर वितरीत करण्यासाठी कोणाला पाठवले गेले याची पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी दोन स्वतंत्र पथके स्थापन केली, त्यापैकी एक खरार आणि दुसरी मोहालीला पाठवण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नराधमांची फाशीची शिक्षा रद्द, नागपूर खंडपीठाकडून मरेपर्यंत जन्मठेप
पुण्यातील भाजप नगरसेवकाच्या हत्येचा कट, भावाला जिंकवण्यासाठी जीवे मारण्याचा प्लॅन