स्कूटीच्या नंबरप्लेटवरील तीन अक्षरं ठरतायत तापदायक, तरुणीला घराबाहेर पडणंही झालंय लाजिरवाणं
प्रीतीच्या वाहनाला आरटीओकडून मिळालेला क्रमांक काहीसा विचित्र निघाला. क्रमांकाच्या मध्यभागी S.E.X ही तीन अक्षरं येतात. खरं तर या शब्दात काहीच वावगं नाही. मात्र सेक्ससारखा शब्द ऐकला किंवा वाचला की अनेकांचे कान टवकारतात, डोळे वटारतात
नवी दिल्ली : नवीन गाडी हा प्रत्येकासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असतो. स्वकष्टाच्या कमाईतून घेतलेली कार असो किंवा दुचाकी, आपण शानदारपणे बसायचं, आणि ऐटीत ती चालवायची, अशी स्वप्नं प्रत्येकानेच रंगवलेली असतात. मात्र तुमच्या नवीन वाहनाचा नंबर (Number Plate) तुमच्यासाठी त्रासदायक आणि लज्जास्पद ठरत असेल तर? अगदी फिल्मी वाटणाऱ्या या सिच्युएशनची निव्वळ दहा सेकंद कल्पना करा. नाही ना करवत? पण असाच एक पेचप्रसंग राजधानी दिल्लीतील (Delhi) एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीसमोर उभा राहिला आहे. मुलीचं नाव आपण प्रीती असं समजूयात.
काय आहे प्रकरण?
प्रीती ही दिल्लीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील सर्वसामान्य मुलगी आहे. तुमच्या-आमच्या प्रमाणेच स्वतःची दुचाकी असल्याची स्वप्नं उराशी बाळगणारी एखादी गर्ल नेक्स्ट डोअर. मागच्या महिन्यात प्रीतीचा वाढदिवस होता, तिने वडिलांकडे वाढदिवसाची भेट म्हणून स्कूटी मागितली. प्रीती आता कॉलेजला जात असल्याने तिच्या वडिलांनी स्वखर्चाने दिल्लीतील एका शोरुममधून तिच्यासाठी स्कूटी बुक केली. आत्तापर्यंत सगळं काही सुरळीत सुरु होतं. मात्र प्रीतीच्या टूव्हीलरच्या क्रमांकावरुन त्रास सुरु झाला.
S.E.X या तीन अक्षरांमुळे गोंधळ
खरं तर, प्रीतीच्या वाहनाला आरटीओकडून मिळालेला क्रमांक काहीसा विचित्र निघाला. क्रमांकाच्या मध्यभागी S.E.X ही तीन अक्षरं येतात. खरं तर या शब्दात काहीच वावगं नाही. मात्र सेक्ससारखा शब्द ऐकला किंवा वाचला की अनेकांचे कान टवकारतात, डोळे वटारतात. अशा प्रसंगात तर सगळेच खिल्ली उडवत हसायला मागे-पुढे पाहत नाहीत.
अनोळखी लोकांकडूनही चिडवाचिडवी
गाडीवर नंबर प्लेट लावायला गेलेल्या प्रीतीच्या भावाला हे तीन शब्द आपल्या कुटुंबाच्या अडचणी वाढवणारे ठरतील, याची जराशीही कल्पना नव्हती. कारण वाहनाच्या नंबर प्लेटवर असलेली S.E.X ही अक्षरे अनेकांना माना वळवून पाहायला लावत होती. वाटेत येणारे-जाणारे, ओळखीचेच काय, अनोळखी लोकही प्रीतीच्या भावावर शेरेबाजी करु लागले.
प्रीतीसाठी लाजिरवाणा क्षण
घरी परतल्यानंतर प्रीतीच्या भावाने हा सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला. हे ऐकून प्रीतीही घाबरली. त्यानंतर प्रीतीने वडिलांना गाडीचा नंबर बदलण्यास सांगितले. यासंदर्भात दिल्लीच्या आरटीओच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, या मालिकेतील सुमारे दहा हजार वाहनांना हा क्रमांक देण्यात आला आहे. परंतु, लोकांचे टोमणे टाळण्यासाठी प्रीतीला आता घराबाहेर पडणेही नकोसे झाले आहे.
प्रीतीला आता तिच्या वाहनाचा नंबर बदलून घ्यायचा आहे, पण ते शक्य आहे का हा प्रश्न आहे. एकदा वाहनाचा क्रमांक दिला की, तो बदलण्याची सध्या कोणतीही तरतूद नाही कारण ही सर्व प्रक्रिया एका सेट पॅटर्नवर चालते, असं वाहतूक विषयातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे प्रीतीच्या प्रॉब्लेमवर सोल्युशन निघणार की कन्फ्यूजन वाढणार, हे वेळच ठरवेल.
संबंधित बातम्या :
राजस्थानमध्ये लग्नाच्या बहाण्याने तरुणीवर 8 वर्षे बलात्कार, आरोपीविरुद्ध तक्रार दाखल
वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली द्यायचे मोठमोठे टार्गेट, पूर्ण न केल्यास दंड वसूल करायचे
प्रयागराज हत्याकांड: एकतर्फी प्रेमातून चौघांची हत्या केल्याचा पोलिसांचा दावा