दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची मोठी कारवाई, 1200 कोटींचे मेथाफेटामाइन ड्रग्ज जप्त
अंमली पदार्थांसह अटक करण्यात आलेले दोन अफगाण नागरिक भारतात निर्वासित म्हणून राहत होते. दोघेही त्यांच्या व्हिसाचा कालावधी सतत वाढवत होते. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्यांच्यावर आधीच पाळत ठेवली होती.
दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने नार्को-टेररवर मोठी कारवाई करत मंगळवारी 1200 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले. या ड्रग्जच्या विक्रीतून मिळणारी रक्कम दहशतवादी कारवायांमध्ये वापरली जाणार होती. कारवाई दरम्यान पोलिसांनी 312.5 किलो मेथाफेटामाइन (Methamphetamine) आणि 10 किलो हेरॉईन (Heroin) जप्त केले आहे. अंमली पदार्थांसह दोन अफगाण नागरिकांनाही अटक (Arrest) करण्यात आली आहे. अंमली पदार्थांची खेप प्रथम चेन्नईहून लखनौ आणि तेथून दिल्लीत आणण्यात आली.
दिल्ली पोलीस स्पेशल सेल अलर्ट मोडवर
हे ड्रग्ज दिल्लीतून हरियाणा, पंजाब, हिमाचल आणि राजस्थानला नेण्यात येणार होते. स्पेशल सेलचे विशेष आयुक्त हर गोविंद धालीवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी 350 किलो ड्रग्ज यापूर्वीच पकडण्यात आले आहेत. नार्को टेररच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांचे स्पेशल सेल अलर्ट मोडवर आहे.
भारतात निर्वासित म्हणून राहत होते अटक अफगाण नागरिक
अंमली पदार्थांसह अटक करण्यात आलेले दोन अफगाण नागरिक भारतात निर्वासित म्हणून राहत होते. दोघेही त्यांच्या व्हिसाचा कालावधी सतत वाढवत होते. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्यांच्यावर आधीच पाळत ठेवली होती.
आरोपींकडून मेथाफेटामाइन आणि हेरॉईन जप्त
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कालिंदी कुंजजवळून एक कार अडवली. या कारमधून मेथाफेटामाइनसह 2 अफगाण नागरिकांना अटक करण्यात आले. मुस्तफा आणि रहीम उल्लाह अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या चौकशीनंतर नोएडा येथून हेरॉईनही जप्त करण्यात आले आहे.
समुद्रामार्गे भारतात आले होतो मेथाफेटामाइन
याशिवाय लखनौ येथून पोत्यातून कच्चा मालही जप्त करण्यात आला आहे. मुस्तफा काबुल आणि दुसरा आरोपी रहीम उल्ला हे कंदहारचे रहिवासी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हे मेथॅम्फेटामाइन अफगाणिस्तानातून समुद्रमार्गे इराणमध्ये आले होते. इराणमधून अरबी समुद्रमार्गे दक्षिण भारतातील बंदरात आणले होते.
अफगाणिस्तान बनले मेथाफेटामाइनचा अड्डा
अफगाणिस्तान आता मेथाफेटामाइन नावाच्या या औषधाचा नवा अड्डा बनला आहे. ही औषधे पाश्चात्य देशांमध्येही पुरवली जात आहेत. विशेष सेलने नार्को टेररिझम संदर्भात यूएपीए अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. त्यांची भूमिका बाहेर आल्यास त्यांचेही नाव या एफआयआरमध्ये जोडले जाईल. (Delhi Police Special Cell seized methamphetamine drugs worth 1200 crores)