आधी वडील गेले, मग काकी; कोरोनाने नोकरी खाल्ली, दुःखाचा डोंगर फोडणाऱ्या तरण्याबांड लेकालाही अखेर नियतीने हिरावलं
शनिवारी रात्री अपघाताच्या 10 मिनिटं आधीच सलीलने पत्नी ममताला फोन करुन आपण घराजवळ असल्याचं सांगितलं होतं. काही वेळात घरी पोहोचेन, असं सांगणारा सलील बराच वेळानंतरही आला नाही. तेव्हा कुटुंबीयांनी शोधाशोध केली. तेव्हा अपघातात त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं.
नवी दिल्ली : दारुच्या नशेत भरधाव कार चालवणाऱ्या पोलिसाने तरुणाला धडक दिल्याची घटना राजधानी दिल्लीतील रोहिणी भागात शनिवारी रात्री उशिरा घडली. या घटनेत सलील त्रिपाठी नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. बुद्ध विहारमध्ये राहणाऱ्या त्रिपाठी कुटुंबावर गेल्या वर्षभरात दु:खाचे इतके मोठे डोंगर कोसळले आहेत, की आज केवळ त्यांचे शेजारीच नाही तर संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे.
38 वर्षीय सलील त्रिपाठीला डोळ्यांसमोर लहानाचं मोठं होताना पाहणारे त्यांचे शेजारी कमलेश गुप्ता भावनावश झाल्याचं वृत्त ‘नवभारत टाईम्स’ने दिलं आहे. शेजारी आणि मित्र जंगबहादूर त्रिपाठी यांच्या निधनाला जेमतेम नऊ महिने होत नाहीत, तोच त्यांचा मुलगा सलील त्रिपाठीनेही या जगाचा निरोप घेतला, यावर विश्वास ठेवणं गुप्तांना कठीण जात आहे.
कसा झाला अपघात
शनिवारी रात्री अपघाताच्या 10 मिनिटं आधीच सलीलने पत्नी ममताला फोन करुन आपण घराजवळ असल्याचं सांगितलं होतं. काही वेळात घरी पोहोचेन, असं सांगणारा सलील बराच वेळानंतरही आला नाही. तेव्हा कुटुंबीयांनी शोधाशोध केली. तेव्हा बाईकला पोलिसाने दिलेल्या धडकेत त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. अपघाताच्या वेळी पोलीस कॉन्स्टेबल जिले सिंह मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती आहे.
त्रिपाठी कुटुंबीय यूपीहून दिल्लीत
त्रिपाठी कुटुंबाचे आजूबाजूच्या रहिवाशांशी घनिष्ठ संबंध होते. मूळचे यूपीच्या आंबेडकर नगर जिल्ह्यातील कमालपूर गावातील असलेले जंगबहादूर त्रिपाठी चार दशकांपूर्वी दिल्लीत आले. या भागात त्यांनी एक छोटा कारखाना उघडला होता, जिथे बॉक्सवर कंपनी किंवा ब्रँडचे नाव छापण्याचे काम केले जात असे.
जंगबहादूर यांचे धाकटे भाऊ श्याम बहादूर त्रिपाठी हवाई दलातून निवृत्त झाले आहेत. दोन्ही भाऊ बुद्ध विहार फेज-2 येथील श्याम कॉलनीतील गल्ली क्रमांक 16 मधील घरात संपूर्ण कुटुंबासह राहत होते. जंगबहादूर यांचा मोठा मुलगा मनोज गावात शेती करतो आणि पत्नीसोबत राहतो. त्यांचा मुलगा गोलू दिल्लीत राहून शिक्षण घेतो. तर धाकटा मुलगा सलील याचे लग्न बनारस येथील ममतासोबत झाले होते. त्यांना दिव्यांश नावाचा दहा वर्षांचा मुलगाही आहे. तो त्याच परिसरातील एका खाजगी शाळेत इयत्ता तिसरीत शिकतो.
वडील-काकी गेले, नोकरीही सुटली
शेजारी कमलेश गुप्ता यांनी सांगितलं की, संपूर्ण कुटुंबाला अचानक कोणाची नजर लागली ते कळलं नाही. गेल्या वर्षी सलीलच्या काकीचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते, तर कोव्हिड संसर्गाने सलीलच्या वडिलांनीही अखेरचा श्वास घेतला. अशा परिस्थितीत घरची जबाबदारी सलीलच्या खांद्यावर आली होती. सलील आधी नवी दिल्लीतील एका सुप्रसिद्ध हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करायचा, पण कोरोनाच्या पहिल्या लाटेने त्याची नोकरी हिरावून घेतली.
फूड डिलिव्हरीचे काम
नोकरी गेल्यानंतरही सलीलने धीर सोडला नाही. तो काहीतरी काम शोधत राहिला आणि या परिस्थितींवर मात करण्याचा प्रयत्न करत राहिला. मित्राच्या सांगण्यावरून तीन-चार महिन्यांपूर्वी त्याने फूड डिलिव्हरीचे काम सुरू केले. त्याच वेळी, तो चांगल्या नोकरीच्या शोधात होता, परंतु हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स वारंवार बंद होत असल्यामुळे त्याला हवी तशी नोकरी मिळू शकली नाही.
कमलेश गुप्तांनी सांगितले की, शनिवारी रात्री सलीलचा अपघातात मृत्यू झाला, त्यावेळी त्याचे काका सलीलच्या वडिलांचे काही विधी पूर्ण करण्यासाठी गावी गेले होते. घरात फक्त सलीलची आई कल्याणी, पत्नी ममता, मुलगा दिव्यांश आणि चुलत भाऊ होते. अपघाताचे वृत्त समजताच संपूर्ण घरावर शोककळा पसरली. रविवारी सकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह हाती मिळाल्यानंतर संपूर्ण कुटुंब गावी अंत्य संस्कारासाठी गेले.
संबंधित बातम्या :
दारासमोर भीक मागितल्याने राग अनावर, भिक्षुकाची निर्घृण हत्या, मृतदेह गटाराजवळ फेकला
नागपुरात सैन्यातील जवानाकडे सोन्याचं बिस्कीट सापडलं, धड उत्तर देईना, मग RPF जवानांनी…
बॉयलरची सफाई करताना हलगर्जी, पुण्यात उकळतं पाणी पडून चौघे भाजले, एकाचा मृत्यू