वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांची कठोर पावले, उल्हासनगर पोलीस परिमंडळातून 38 गुंड हद्दपार
जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख वाढत चालला होता. यामुळे उल्हासनगर परिमंडळ 4 मध्ये पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत.
उल्हासनगर : ठाणे जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. दिवसाढवळ्या, भररस्त्यात सर्रासपणे गुन्हेगार गुन्हा करतात आणि पसार होतात. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. यामुळे पोलिसांनी आता गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. या कारवाईअंतर्गत पोलीस परिमंडळ-4 मध्ये तब्बल 38 गुंडावर हद्दपरीची कारवाई करण्यात आली आहे. मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी ही माहिती दिली. या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये दहशत पसरुन गुन्हेगारी कमी होईल अशी आशा आहे.
गेल्या काही दिवसात गुन्हेगारी घटना वाढल्या होत्या
काही दिवसात उल्हासनगरमध्ये मोठ्या गुन्हेगारी घटना घडल्या आहेत. उल्हासनगर कँप 2 मध्ये सराफाच्या दुकानात डल्ला मारुन चोरट्यांनी तब्बल 3 कोटी 20 लाख रुपयांचे मुद्देमाल चोरुन नेला. चार दिवसांपूर्वी उल्हासनगरमधील भाजप पदाधिकारी नरेश रोहिडा यांच्या कार्यालयावर गोळीबाराची घटना घडली होती. याव्यतिरिक्त हत्या, फसवणूक, हाणामारीसारख्या अनेक घटना वारंवार घडत होत्या. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
परिमंडळ 4 अंतर्गत विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 38 गुंड तडीपार
वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार उल्हासनगर परिमंडळ 4 पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाई अंतर्गत 38 गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 11, मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 4, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 4, हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 2, अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 8, शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 7 अशा एकूण 38 गुंडांना तडीपार करण्यात आले आहे.