धुळे : धुळ्यात एका 80 वर्षीय आजीचा मृतदेह एका गटातील कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या आजी गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होत्या. त्यांचे कुटुंबिय गेल्या दोन दिवसांपासून त्यांचा शोध घेत होते. त्यानंतर आजीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरातील नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. स्थानिक नागरिकांना मृतदेह दिसल्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात संबंधित मृतदेह हा 80 वर्षीय आजी कस्तुराबाई वानखेडे यांचा असल्याची माहिती समोर आली आहे.
दोन दिवसांपूर्वी कस्तुराबाई या विष्णूनगर देवपूर येथून अचानक बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचे कुटुंबिय त्यांचा शोध घेत होते. पण कस्तुराबाई यांचा तपास लागत नव्हता. अखेर कुटुंबियांनी देवपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस आणि कुटुंबिय आजींचा शोध घेतच होते. तसेच परिसरातील इतर नागरिक वानखेडे कुटुंबियांचे नातेवाईक सर्वच आजीचा शोध घेत होते. या दरम्यान आज (12 सप्टेंबर) दुपारच्या सुमारास आंबेडकर शाळेजवळ चंदन नगर परिसरात एका गटारीत एका वृद्धेचा मृतदेह आढळला.
संबंधित घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तिथे दाखल होत घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी संबंधित मृतदेह हा दोन दिवसांपूर्वी विष्णूनगर देवपूर येथून बेपत्ता झालेल्या 80 वर्षीय आजींचाच असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. पोलिसांनी याबाबतची माहिती वृद्धेच्या कुटुंबियांना दिली. त्यानंतर कुटुंबिय घटनास्थळी दाखल झाले. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. पोलीस अनेक बाजूंनी घटनेचा तपास करत आहेत.
दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात दगडाच्या बंद खाणीतील तळ्यात एकाच कुटुंबातील 3 मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. मृतकांमध्ये एका पुरुषासह दोन लहान मुलांचा समावेश होता. या घटनेमागे नेमकं कारण काय ते समजू शकलं नव्हतं. पण पित्याने आपल्या दोन मुलांसह बंद खाणीतील तळ्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय होता. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
संबंधित घटना ही नाशिकच्या सिद्ध पिंपरी गावात घडली होती. एकाच कुटुंबातील 3 जणांचे अशाप्रकारे मृतदेह आढळल्याने गावात खळबळ उडाली. तसेच या दुखद घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. वडिलासह दोन मुलांचा अशाप्रकारे मृतदेह सापडणे हे धक्कादायक असल्याची चर्चा सुरु असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. खाणीत सापडलेल्या मृतदेहांमध्ये 34 वर्षीय शंकर महाजन, त्यांचा 4 वर्षीय मुलगा पृथ्वी महाजन आणि 3 वर्षीय मुलगी प्रगती महाजन यांचा समावेश आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पण ही एक आत्महत्येची घटना असल्याचा पोलिसांना संशय आहे.
हेही वाचा :
हातोड्याच्या धाकाने स्कायवॉकवरुन मित्रांना पळवलं, शिर्डीहून आलेल्या 14 वर्षीय मुलीवर बलात्कार
प्रसुतीसाठी दाम्पत्य हॉस्पिटलला, चोरट्याची घरफोडी, दोन फेऱ्यात अर्ध-अर्ध सामान नेलं