डोंबिवलीत पोलिसांना गुन्हेगारांना दणका, 9 टोळ्यावर उगारला कारवाईचा बडगा, टोळीत कुणाचा समावेश?
शहरातील वाडथी गुन्हेगारी पाहता पोलिसांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी कंबर कसली आहे. पोलीस उपायुक्तांच्या आदेशानुसार पोलीस पथकाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

सुनील जाधव, डोंबिवली : शहरातील वाढती गुन्हेगारी पाहता डोंबिवली पोलिसांनी आता गुन्हेगारांविरोधात कंबर कसली आहे. मागील काही दिवसापासून कल्याण-डोंबिवलीत वाढलेल्या सामूहिक गुंडगिरी विरोधात कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी महत्वपूर्ण कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत डोंबिवली शहरातील 9 संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील 24 आरोपींवर मोक्कातंर्गत कारवाई केली. चोरी, हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा, खंडणी यासारख्या गंभीर गुन्ह्यात या आरोपींचा सहभाग होता. या टोळीत विशेषतः रस्त्यावर चालणाऱ्या महिलांच्या गळ्यातील चैन खेचून चैन स्नॅचिंग करणाऱ्या 3 इराणी टोळींचाही समावेश आहे.
सहायक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांची कारवाई
वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सराईत गुन्हेगारांविरोधात एमपीडीए अंतर्गत कारवाई केल्यानंतर आता डोंबिवली सहायक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनीही डोंबिवली पूर्व पश्चिम परिसराकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. मानपाडा, विष्णुनगर, टिळकनगर, डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी नागरिकांना धमकावून त्याच्याकडून पैसे लुटणे, जबरीने सोनसाखळी चोरी करणे, खंडणी मागणे, घरफोडी, हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या 9 संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील 24 आरोपींच्या मुसक्या आवळत त्यांच्यावर मोक्काअतंर्गत कारवाई केली आहे.
आणखी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणार
या 9 संघटित गुन्हेगार टोळ्यांमध्ये रस्त्यावर चालणाऱ्या महिलांची चैन स्नॅचिंग करणाऱ्या तीन इराणी टोळींचाही समावेश असून, त्यांच्यावरही मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तर या कारवाईमुळे डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ शहरातील रस्त्यावर होत असलेली गुन्हेगारी रोखण्यासाठी, तसेच महिलांसोबत घडणाऱ्या सोनसाखळीच्या गुन्ह्यांना नक्कीच आळा बसेल. तसेच अशा कारवाया यापुढे देखील होत राहतील. अप्पर पोलीस आयुक्त दत्ता शिंदे, कल्याण परिमंडळ-3 चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी काही गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे डोंबिवलीचे सहायक पोलीस आयुक्त सुनिल कुराडे यांनी सांगितले.