टिटवाळ्याहून आली अन् ठाकुर्लीला बॅग चोरी करून गेली, पण सीसीटीव्हीत कैद झाली अन्…
रेल्वे स्थानकात चोऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. प्रवाशांचं लक्ष नसताना त्यांच्या मौल्यवान वस्तू घेऊन पोबारा करण्यात महिला चोरट्यांचेही प्रमाण मोठे आहे.
डोंबिवली : रेल्वे स्थानकात चोऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. प्रवाशांचं लक्ष नसताना किंवा गर्दीचा फायदा घेत त्यांना लुटण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. यामध्ये महिलाही मागे नाहीत. संशय येऊ नये म्हणून हातात लहान मुलं घेऊन फिरत प्रवाशांवर लक्ष ठेवतात आणि संधी मिळताच चोरी करुन पसार होतात. अशीच एक घटना ठाकुर्ली परिसरात घडली आहे. एक महिला मंगळसूत्र असलेली बॅग चोरुन पसार झाली. मात्र सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी या चोरट्या महिलेचा शोध घेत तिच्याकडून चोरलेली वस्तू हस्तगत केली.
ठाकुर्ली रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक 1 वरून एक हॅन्ड बॅग चोरीला गेल्याची तक्रार डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या बॅगेमध्ये 70 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र होते. वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि सूचनेनुसार गुन्हे शाखा युनिट-3, कल्याण लोहमार्ग, मुंबई येथील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी सदर गुन्ह्याच्या तपासात घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी अटक
सीसीटीव्हीत एक महिला बॅग उचलून चोरुन घेऊन ठाकुर्ली शहर हद्दीत गेली असल्याचे दिसून आले. परंतु ठाकुर्ली शहर हद्दीत सीसीटीव्ही नसल्याने ती बॅग घेऊन कुठे गेली याचा सुगावा लागत नव्हता. त्यामुळे ठाकुर्ली रेल्वे स्टेशन येथे कल्याण दिशेकडून आलेल्या लोकलचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता, सदर महिला ही कल्याणकडून येणाऱ्या लोकलमधून मुलासह ठाकुर्ली येथे उतरली असल्याचे दिसून आले. पोलिसांनी कर्जत आणि कसारा दिशेकडील प्रत्येक रेल्वे स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले.
महिलेकडून चोरीला गेलेले मंगळसूत्र हस्तगत
बॅग उचलून चोरी करणारी महिला ही टिटवाळा शहर हद्दीतून आली असल्याचे अखेर निष्पन्न झाले. ही महिला टिटवाळा स्टेशनबाहेर पोलिसांना आढळून आली. तिच्याकडे अधिक चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिच्याकडून 4 लाख 20 हजार रुपयांचे 70 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत केले. मात्र प्रत्येक वेळी चोरीला गेलेली वस्तू सापडेलचं असं नाही. त्यामुळे प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.