कॉलेज तरुणींचा कपडे बदलताना… आयआयटी दिल्लीतील ‘त्या’ प्रकारावर देशभरातून संताप

| Updated on: Oct 08, 2023 | 10:19 AM

दिल्ली आयआयटीत अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. आयआयटीत फॅशन शोला आलेल्या काही विद्यार्थीनींबाबत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

कॉलेज तरुणींचा कपडे बदलताना... आयआयटी दिल्लीतील त्या प्रकारावर देशभरातून संताप
Follow us on

नवी दिल्ली | 8 ऑक्टोबर 2023 : आयआयटी दिल्लीत अत्यंत धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार घडला आहे. फॅशन शोसाठी आलेल्या विद्यार्थीनींचा अश्लील व्हिडीओ बनवविण्यात आला आहे. या विद्यार्थीनी वॉशरुमध्ये कपडे बदल असताना त्यांचे व्हिडीओ काढण्यात आला. आयआयटी दिल्लीतील सफाई कर्मचाऱ्यानेच हे कृत्य केल्याने खळबळ उडाली आहे. एका मुलीच्या प्रसंगावधानामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या सफाई कर्मचाऱ्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

आकाश असं या सफाई कामगाराचं नाव आहे. तो मंगलापूर पालम येथील रहिवाशी आहे. आयआयटी दिल्लीत त्याची आऊटसोर्स कर्मचारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. शुक्रवारी त्याने हे धक्कादायक कृत्य केलं. आयआयटी दिल्लीत फॅशन शोचं आयोजन करण्यात आळं होतं. या फॅशन शोमध्ये भाग घेण्यासाठी दिल्ली विद्यापीठाच्या भारती महाविद्यालयाच्या 10 विद्यार्थीनी आयआयटीत आल्या होत्या. या शोवेळी या मुली कपडे बदलण्यासाठी वॉशरुममध्ये गेल्या होत्या. यावेळी आकाशने लपून त्यांचा व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली होती. तेवढ्यात एका विद्यार्थीनीचे त्याच्यावर लक्ष गेलं आणि तिने आरडाओरड सुरू केली.

मोबाईल चेक केला अन्…

त्यामुळे आकाशने घटनास्थळावरून पळण्याचा प्रयत्न केला. पण लोकांनी त्याला तात्काळ पकडलं. यावेळी लोकांनी त्याचा मोबाईल चेक केला. त्यात व्हिडीओ मिळताच पोलिसांना फोन करून बोलावण्यात आलं. किशन गड पोलिसांनी आकाशला अटक केली असून त्याला कोर्टात दाखल केलं. कोर्टाने त्याची तुरुंगात रवानगी केली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेने या प्रकाराचा निषेध नोंदवला आहे.

विद्यार्थीनींचा संताप

विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष तुषार डेढा यांनी या प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एनएसयूआयचे राष्ट्रीय महासचिव आणि दिल्लीचे प्रभारी नीतीश गौर यांनीही या घटनेचा निषेध नोंदवला आहे. तर विद्यार्थीनींनीही या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. शौचालयाच्या बाहेर महिला सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेली नव्हती.

घटनेनंतर लगेच आरोपीला अटक करण्यात आली होती. पण आयआयटी प्रशासनाने गुन्हा दाखल करण्यात उशीर केला. तसेच लोकांनी जो फोन ताब्यात घेतला होता. तो फोन पोलिसांना देण्यात आलेला नाही. पोलिसांना दुसराच फोन देण्यात आला होता, असा दावा या विद्यार्थीनींनी केला आहे.