मोठी बातमी ! कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीकडून अटक
कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विवेक पाटील यांना अटक करण्यात आली आहे (ED arrest former MLA Vivek Patil on Karnala bank scam).
नवी मुंबई : कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी बँकेचे अध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. विवेक पाटील यांची अटक करण्याबाबत ईडीने पत्र काढले. त्यानंतर ईडीने विवेक पाटील यांना त्यांच्या पनवेल येथील घरातून ताब्यात घेतलं आहे. या गैरव्यवहारात मनीलाँड्रींग झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. पनवेलमध्ये या गैरव्यवहाराविरोधात काही महिन्यांपूर्वी मोर्चे काढण्यात आले होते. विवेक पाटील यांच्या धोरणामुळे ठेवीदार संकटात सापडले होते. ईडीने या कारवाई दरम्यान पाटील यांच्या घराचीही झाडाझडती घेतल्याची सूत्रांची माहिती आहे (ED arrest former MLA Vivek Patil on Karnala bank scam).
नेमकं प्रकरण काय?
कर्नाळा बँकेत 650 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा उघडकीस आल्यानंतर बँकेच्या व्यवहारांवर मर्यादा आली होती. ठेवीदार आणि खातेधारकांना त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळावे यासाठी पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी खातेदार आणि ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचवला होता. बँकेच्या विरोधात ठेवीदारांसोबत आंदोलनही केले होते.
यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांना ईडी कार्यालयात बोलवलं होतं. दोन्ही आमदारांनी आपले म्हणणे ईडी कार्यालयात जाऊन मांडले होते. घोटाळ्यासंदर्भातील पुरावे सादर केले असल्याची माहिती पुढे आली होती. ईडीच्या चौकशीमुळे बँक आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार विवेकानंद पाटील यांच्यावर आता टांगती तलवार होती.
कर्नाळा बँक अध्यक्ष, संचालकांसह 76 जणांविरुद्ध गुन्हा
कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी रायगड जिल्हा विशेष लेखापरीक्षकांनी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह संचालक, अधिकारी अशा 76 जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. त्याआधारे याआधीच सर्वांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.
गुन्हे दाखल होऊनही ठेवीदारांच्या पैशांबाबत कुठलीही हालचाल दिसत नाही, म्हणून आम्ही ईडी कार्यलयात गेलो होतो. ठेवीदारांचे कष्टाचे पैसे परत मिळावे, हाच आमचा उद्देश आहे. आम्हाला राजकारण करायचं नाही. पण यात खूप मोठं मनी लॉड्रिंग झाले आहे, असा आरोप प्रशांत ठाकूर यांनी केला होता.
हेही वाचा : वय अवघं 22, तब्बल 56 गुन्हे, खडकपाडा पोलिसांकडून 27 वा मोस्ट वॉण्टेड चोरट्याचा खेळ खल्लास