ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाच्या घरी ईडीचा छापा, खाटेखाली सापडले 7 कोटी; नोटांचं घबाड पाहून अधिकारीही चक्रावले
खान यांच्या घराला सीआरपीएफ जवानांचा वेढा पडला आहे. तसेच या परिसरात अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत. ईडीने आधीच बँक अधिकाऱ्यांना संपर्क साधला होता. नोटा मोजण्याची मशीही मागवली जात आहे.
कोलकाता: कोलकातामध्ये ईडीने (ED) मोठी छापेमारी केली आहे. ईडीने एका ट्रान्सपोर्ट (Transporters) व्यावसायिकाच्या घरी छापेमारी केली असता त्याच्या घरात खाटेखाली एक दोन नव्हे तर सात कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली आहे. 500 आणि 2000 हजारांचे बंडलचे बंडल या व्यक्तिच्या घरात सापडल्याने ईडीचे अधिकारीही चक्रावून गेले आहेत. खाटेखाली एका प्लास्टिकच्या पाकिटात 500 आणि 2000 चे असंख्य बंडल (Assets) सापडले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्कम सापडल्याने ही रक्कम मोजण्यासाठी नोटा मोजण्याची मशिन मागवली जात आहे. ही रक्कम गाय किंवा कोळसा घोटाळ्यातील तर नाही ना याबाबत ईडीचा तपास सुरू आहे. मात्र, ईडीने याविषयी काहीही भाष्य केलेलं नाही.
कोलकाताच्या गार्डेनरिचच्या शाही स्टेबल लेनमध्ये राहणाऱ्या निसार खान यांच्या घरात हे घबाड सापडलं आहे. केंद्रीय सुरक्षा दलाने निसार खानचं हे घर घेरलं आहे. खान यांच्या घरात सात कोटींचं घबाड सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर साल्टलेक येथील सीजीओ कॉम्प्लेक्सपासून ईडीचे आणखी अधिकारी खान यांच्या घराच्या दिशेने रवाना झाले आहेत.
तीन ठिकाणी छापेमारी
निसार खान यांचं दुमजली घर आहे. या घरात ईडीने आज छापेमारी केली. तेव्हा पलंगाच्याखाली प्लास्टिक बॅगेत त्यांना 500च्या नोटांचे असंख्य बंडल सापडले. तर दोन हजार रुपयांच्या नोटांचा एक बंडल सापडला आहे. आज सकाळीच ईडीने कोलकात्यात तीन ठिकाणी छापेमारी केली. पार्क स्ट्रिटच्या जवळ मॅकलियोड स्ट्रीटवर ईडीचं सर्च ऑपरेशन सुरू आहे. तसेच अन्य ठिकाणीही छापेमारी करण्यात आली असून तिथूनही ईडीच्या हाती काही लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सीआरपीएफ जवानांचा वेढा
दरम्यान, खान यांच्या घराला सीआरपीएफ जवानांचा वेढा पडला आहे. तसेच या परिसरात अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत. ईडीने आधीच बँक अधिकाऱ्यांना संपर्क साधला होता. नोटा मोजण्याची मशीही मागवली जात आहे. ईडीने ताब्यात घेतलेल्या पैशाचा काहीच हिशोब नाहीये. हा पैसा कुठून आला? कसा आणला? याची काहीच माहिती नाही. त्यामुळे ईडीने खान यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची चौकशी सुरू केली आहे. खान यांच्या घरात सात कोटींची रोख रक्कम सापडल्याची बातमी संपूर्ण कोलकात्यात वाऱ्यासारखी पसरली आहे. त्यामुळे खान यांच्या घराबाहेर बघ्यांची प्रचंड गर्दी झाली असून उलट सुलट चर्चाही सुरू आहेत.