Ulhasnagar | उल्हासनगर शिवसेना शहरप्रमुख चौधरींसह 18 जणांवर गुन्हे दाखल, एकनाथ शिंदेंविरोधात घोषणाबाजी केल्याचा ठपका!
श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयाच्या तोडफोडीनंतर तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांची उल्हासनगर पोलिसांनी धरपकड केल्यानंतर शिवसैनिकांनी उल्हासनगर पोलीस ठाण्याबाहेर एकनाथ शिंदे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली होती.
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. मात्र, यानंतर राज्यात शिवसेना विरूध्द शिंदे गट असा संघर्ष बघायला मिळतोय. उल्हासनगरचे शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह 17 ते 18 जणांविरोधात उल्हासनगर पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केलाय. एकनाथ शिंदेंच्या विरोधात घोषणाबाजी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामुळे आता उल्हासनगरमधील राजकारण चांगलेच तापले आहे. 25 जून रोजी उल्हासनगरच्या गोलमैदान परिसरातील खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती.
उल्हासनगर पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी
श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयाच्या तोडफोडीनंतर तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांची उल्हासनगर पोलिसांनी धरपकड केल्यानंतर शिवसैनिकांनी उल्हासनगर पोलीस ठाण्याबाहेर एकनाथ शिंदे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली होती. आता याचप्रकरणी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, उपशहरप्रमुख राजेंद्र शाहू, संदीप गायकवाड, विभागप्रमुख शिवाजी जावळे, भगवान मोहिते, आदेश पाटील, ज्ञानेश्वर मरसाळे, महेंद्र पाटील यांच्यासह तब्बल 17 ते 18 जणांवर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सागर उटवाल यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल
शिंदे समर्थक शिवसैनिक सागर उटवाल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हे गुन्हे दाखल केले. याबाबत उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. राजेंद्र चौधरी हे दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेचे नगरसेवक आणि पदाधिकारी यांना घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले होते. त्यानंतर हा गुन्हा दाखल झाल्यानं सत्तासंघर्ष संपल्यानंतर आता संघटनेत अंतर्गत संघर्ष सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत.