स्पेशल 26 स्टाईल लूट, खोट्या करप्शन अधिकाऱ्यांचा छापा, तब्बल 23 लाख घेऊन फरार
राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूर शहरात हिंदी चित्रपट 'स्पेशल 26 स्टाईल लूट' सारखं एका कुटुंबाला लुबाडलं गेल्याची घटना समोर आली आहे (Fake ACB officers raid in Jaipur looted 23 lakh rupees).
जयपूर : अँटी करप्शनचे अधिकारी अचानक घरी आले तर? खरंतर सर्वसामान्य गरीब घरात तर ते येणारच नाहीत. पण मोठमोठे व्यापारी, उद्योगपती, राजकारण्यांच्या घरात एसीबी अधिकाऱ्यांच्या धाडी पडल्याचं आपण ऐकलं आहे. खरंतर कर नाहीच त्याला डर कसला? पण अचानक एसीबी अधिकारी घरी आले तर अनेकांची भंबेरी उडणं हे साहजिकच आहे. त्याचाच फायदा घेऊन काही भामट्यांनी राजस्थानमधील एका व्यवसायिक कुटुंबाला लुबाडलं आहे. ‘स्पेशल 26 स्टाईल लूट’ या चित्रपटासारखं तीन चोरट्यांनी राजस्थानात एका कुटुंबाल 23 लाखांचा चुना लावला आहे (Fake ACB officers raid in Jaipur looted 23 lakh rupees).
नेमकं प्रकरण काय?
राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूर शहरात हिंदी चित्रपट ‘स्पेशल 26 स्टाईल लूट’ सारखं एका कुटुंबाला लुबाडलं गेल्याची घटना समोर आली आहे. जयपूरच्या एका व्यवसायिकाच्या घरात तीन इसमांनी अँटी करप्शन ब्यूरोचे अधिकारी सांगत छापा टाकला. त्यांनी संपूर्ण घर पिंजून काढलं. त्यांना घरात 23 लाख रुपये रोख रक्कम मिळाली. ते कारवाईच्या नावाने सर्व पैसे कार्यालयात घेऊन जातो सांगत फरार झाले. आरोपींनी दोन हार्डडिस्कही चोरी केल्याची घटना समोर आली आहे.
घरात फक्त व्यवसायिकाचा मुलगा होता
संबंधित घटना ही जयपूरच्या जवाहरलाल नगर येथील सेक्ट सातमध्ये दीपक शर्मा यांच्या घरी घडली आहे. दीपक शर्मा हे व्यवसायिक आहेत. खोट्या एसीबी अधिकाऱ्यांनी घरात जेव्हा छापा टाकला तेव्हा फक्त दीपक यांचा मुलगा विनीत हा एकटा होता. तीन इसम घरी आले. घरात शिरताच क्षणी त्यांनी कारवाईच्या नावाने शोधाशोध सुरु केली. ते घरातील डब्बे वगैरे बघायला लागले. यावेळी त्यांना 23 लाख रुपये मिळाले. त्यांनी ते 23 लाख घेतले आणि तिथून ते फरार झाले.
पोलिसांना तक्रार
या घटनेनंतर विनीतने आपले वडील दीपक शर्मा यांना फोन करुन माहिती दिली. त्याच्या वडिलांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. डीसीपी अभिजीत सिंह यांच्यासह क्राईम ब्रांचची टीम देखील तिथे आली. सध्या पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.
विनीतनेच घरात 23 लाख असल्याचं सांगितलं, तपासात उघड
दरम्यान, खोट्या एसीबी अधिकाऱ्यांना बघून विनीत हा घाबरला आणि त्याने स्वत:हून घरात 23 लाख रुपये असल्याची माहिती त्यांना दिली. मात्र, त्यानंतर त्याला खोट्या अधिकाऱ्यांच्या हालचालींवर संशय आला. त्यामुळे त्याने पोलिसांना याबाबत सूचना दिली, अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.
पोलिसांची भूमिका काय?
जवाहरलाल नगर पोलिसांना या घटनेबाबत विचारलं असता या प्रकरणी तपास सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. आम्ही लवकरच सीसीटीव्हीच्या आधारावर चोरट्यांना शोधून काढू, असं पोलिसांनी सांगितलं (Fake ACB officers raid in Jaipur looted 23 lakh rupees).
हेही वाचा : दुसरीत शिकणाऱ्या नातीसोबत अश्लील कृत्य, मुलीवरही अनेकदा बलात्कार, 65 वर्षीय वृद्धाचा संतापजनक प्रताप