Nashik|मुलगा सैन्यात म्हणून सेवानिवृत्त जवानाने गावजेवण दिले; इकडे तोतया लष्करी अधिकाऱ्याने बेरोजगारांसह पत्नीलाही गंडवले
तोतया लष्करी अधिकारी गणेश पवारने बनावट कागदपत्रांच्या आधारे चांदवडमधील एका बँकेतून 39 लाखांचे कर्ज घेतल्याचेही समोर आले आहे.
नाशिकः सैन्यात नोकरी देण्याचे आमिष दाखवून बेरोजगारांना 32 लाखांचा गंडा घालणारा, बनावट शिक्के वापरून 39 लाखांचे कर्ज घेणारा आणि मोठ्या ऐशोरामात राहणाऱ्या तोतया लष्करी अधिकाऱ्याला नाशिकमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. गणेश वाळू पवार (वय 26, रा. कोणार्कनगर) असे या भामट्याचे नाव आहे. त्याची सध्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. चौकशीत त्याचे अनेक कारनामे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे या भामट्याने चक्क लष्करातून सेवानिवृत्त झालेले वडील आणि स्वतःच्या पत्नीला फसवल्याचे समोर आले आहे.
अन् जाळ्यात सापडला
देवळाली कॅम्प येथील लष्करी हद्दीत मोठ्या थाटात लष्करी गणवेश घालून, गाडीवर लष्कराचे लोगो लावून एक भामटा वावरत होता. या भामट्याला देवळाली कॅम्प येथील मिलिटरी हॉस्पिटल गेटजवळ आडवले. तेव्हा त्याने तिथे सुभेदार रामप्पा बनराम यांना आपण लष्करात नोकरीसाठी असून, हरियाणाच्या इस्सार येथील 115 फिल्ड रेजिमेंटमध्ये पोस्टिंग असल्याचे सांगितले. त्याची झडती घेतली. त्याच्याकडे कुठलेही अधिकृत ओळखपत्र नव्हते. त्याच्याविरोधात सुभेदार रामप्पा बनराम यांच्या तक्रारीवरून गणेश पवारविरोधात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेरोजगारांना 32 लाखांचा गंडा
गणेश पवार पवार हा भामटा लष्करी गणवेशात रहायचा. बेरोजगारांना लष्करात नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवायचा. त्याने काही जणांकडून 32 लाखांच्या वर रक्कम उकळल्याचे समोर आले आहे. नोकरभरतीच्या नावाखाली त्याने दिगंबर मोहन सोनवणे यांच्याकडून 5 लाख, राजाराम शिंदे यांच्याकडून 4 लाख, नीलेश खैरे यांच्याकडून 3 लाख, परशुराम आहेर यांच्याकडून 15 लाख आणि वैभव बाबाजी खैरे यांच्याकडून 5 लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे. हा आकडा आणि फसवणूक झालेल्यांची संख्याही वाढू शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
बँकेला 39 लाखांचा चुना
गणेश पवारकडे लष्करी मुख्यालयाच्या नावाचा बनावट रबरी शिक्का, चारित्र्य प्रमाणत्र आणि नोकरी विषयक इतर बनावट कागदपत्रे आढळली आहेत. या कागदपत्रांच्या आधारे त्याने चांदवडमधील एका बँकेतून बनावट कागदपत्रांचा वापर करत 39 लाखांचे कर्ज घेतल्याचेही समोर आले आहे. विशेष म्हणजे चांदवड येथीलच प्रल्हाद कोल्हे यांच्या एकनाथ स्टोअरमधून हे बनावट शिक्के तयार केले आहेत. तो गाडीवरही लष्कराचे स्टीकर लावून फिरायचा. अंगात लष्करी गणवेश. त्यामुळे अनेकजण त्याच्यावर चटकन विश्वास ठेवत असत. याचाच त्याने गैरफायदा घेतला.
वडील, पत्नीलाही फसवले
गणेश पवारचे वडील वाळू पवार हे लष्करातून सेवानिवृत्त झालेत. त्यांनाही गणेशने फसवले. आपण लष्करात लेफ्टनंट कर्नल झाल्याचे सांगितले. या बातमीने त्यांचा आनंद गगनात मावला नाही. त्यांनी गावात त्याचा सत्कार केला. सगळ्या गावाला गावजेवण दिले. त्यावर पावणेदोन लाख रुपये खर्च केले. मात्र, त्याने त्यांनाही फसवले. गणेशचे स्वतःचे बीए पर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले आहे. त्याची पत्नी बीएससी शिकलेली आहे. 2017 च्या बॅचमध्ये आपण लेफ्टनंट झाल्याची थाप मारत त्याने सटाणा येथील गीतांजली यांच्यासोबत जानेवारीमध्ये लग्न केले. विशेष म्हणजे तिलाही शेवटपर्यंत आपले खरे रूप कळू दिले नाही.
इतर बातम्याः