Sarita Choudhary | दरवाजा आतून बंद, सुप्रसिद्ध गायिका राहत्या घरी मृतावस्थेत, सरिता चौधरींची हत्या की आत्महत्या?
सरिता चौधरी यांचा मृतदेह घरात आढळल्याची माहिती मिळताच पथक घटनास्थळी पोहोचले. सरिता यांच्या तोंडातून रक्त येत असल्याचे दिसले. ही हत्या आहे की आत्महत्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
चंदिगढ : हरियाणवी गायिका सरिता चौधरी (Haryanvi Singer Sarita Chaudhary died) यांचा अकस्मात मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोमवारी त्यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला. हरियाणातील (Haryana) सेक्टर-15 येथील राहत्या घरात त्या मृतावस्थेत आढळल्या. त्यांच्या तोंडातून रक्तही येत होतं. सरिता चौधरी (Sarita Choudhary) यांच्या मृत्यूच्या वृत्ताने कुटुंबासह चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. सरिता चौधरी यांनी आत्महत्या केली, त्यांचा अपघात झाला की त्यांच्यासोबत घातपात झाला, हा प्रश्न निर्माण झाला आहे. चौधरींच्या मृत्यूमुळे हरियाणात एकच खळबळ उडाली आहे.
राहत्या घरी मृतावस्थेत
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितले की, सरिता चौधरी यांचा मृतदेह घरात आढळल्याची माहिती मिळताच पथक घटनास्थळी पोहोचले. सरिता यांच्या तोंडातून रक्त येत असल्याचे दिसले. ही हत्या आहे की आत्महत्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी सांगितले की, फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचून नमुने गोळा करत आहे.
फोन न उचलल्याने नातेवाईक घरी
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरिता चौधरी या सेक्टर-15 येथील हाउसिंग बोर्ड सोसायटीमध्ये राहत होत्या आणि त्या सेक्टर-12 येथील प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका होत्या. सोमवारी चौधरी यांनी फोन उचलला नाही तेव्हा त्यांचे नातेवाईक घरी पोहोचले आणि त्यांचा मृतदेह घरात सापडलेला दिसला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कोण होत्या सरिता चौधरी?
हरियाणवी रागिणी कलाकार सरिता चौधरी या हरियाणातील प्रसिद्ध लोकगायिका होत्या. हरियाणामध्ये त्यांनी स्टेज शोमध्ये मोठे नाव कमावले. सरिता चौधरी सध्या एका प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत असून त्यांना एक मुलगा आणि मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. त्यांची मुलगी सध्या यूपीएससी परीक्षेची तयारी करत आहे. संपूर्ण प्रकरणाचा खुलासा शव विच्छेदनानंतरच होईल, असे पोलिसांनी सांगितले.
संबंधित बातम्या :
नांदेड-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात, सोमनाथ हंटेच्या शरीराचे अक्षरश: दोन तुकडे!
मावळचे पहिले शिवसेना खासदार गजानन बाबर यांचे निधन ; 79 वर्षी घेतला अखेरचा श्वास