अतिवृष्टीमुळे सारं पीक वाहून गेलं, डोक्यावर कर्जाचा डोंगर, भरलेला संसार अर्ध्यावर सोडून बीडमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या
अतिवृष्टीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं. त्यामुळे बँकेचे कर्ज, लोकांची देणी आणि कुटुंब कसं चालवावं? या आर्थिक विवंचनेतून एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात दोरीने झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली.
परळी (बीड) : अतिवृष्टीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं. त्यामुळे बँकेचे कर्ज, लोकांची देणी आणि कुटुंब कसं चालवावं? या आर्थिक विवंचनेतून एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात दोरीने झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. संबंधित घटना ही परळी तालुक्यातील तडोळी येथे घडली. आत्महत्या करणाऱ्या 40 वर्षीय शेतकऱ्याचं नागनाथ श्रीरंग सातभाई असं नाव आहे. या आत्महत्येने पुन्हा एकदा आर्थिक विवंचनेतून शेतकरी टोकाचे पाऊल उचलत असल्याचं समोर आलं आहे. नागनाथ यांच्या नातेवाईकांचा अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
सरकारची मदतीची घोषणा झाली. मात्र अद्याप रुपयाही मदत मिळाली नाही म्हणून तात्काळ मदत देणे गरजेचे आहे. अन्यथा आत्महत्येचे सत्र सुरुच राहणार आहे. विशेष म्हणजे या आत्महत्या पाठीमागे पोखरा या कृषी विभागाच्या योजनेमधील अधिकाऱ्यांची अनास्था देखील जबाबदार आहे. पेरु लागवडीचे अनुदान वेळेवर दिले नाही. त्यातच आस्मानी संकट यातून ही आत्महत्या झाली असल्याचं नातेवाईकांचा आरोप आहे.
तीन वर्षांपासून अनुदान मिळाले नाही
तडोळी येथील नागनाथ यांनी गेल्या तीन वर्षांपासून पेरुच्या झाडांची लागवड केली होती. तीन वर्षांपासून कृषी कार्यालयाकडून आजतागायत अनुदान त्यांना भेटले नाही. त्यातच आता अतिवृष्टीने हाता-तोंडाशी आलेली पिके वाया गेली. जमिनीही वाहून गेल्या. नागनाथ यांचे यात मोठे नुकसान झाले होते. तसेच आगोदरच डोक्यावर एवढे कर्ज असल्याने फेडायचे कसे? असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. याच चिंतेतून नागनाथ श्रीरंग सातभाई यांनी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा भरलेला संसार अर्ध्यावर सोडून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.
नागनाथ यांच्यावर भारतीय स्टेट बँकेचे एक लाखापेक्षा जास्त कर्ज आहे. तसेच कृषी विभागाच्या पोखरा योजनेअंतर्गत पेरु या फळबागाची लागवड त्यांनी केली. पण दोन वर्षांपासून सरकारी कार्यालयाचे खेटे मारुनही त्यांना अनुदान मिळत नव्हतं. त्यात अतिवृष्टीने सोयाबीन पीक गेलं म्हणून ते निराशेच्या गर्तेत सापडले होते, असं कुटुंबीयांनी सांगितलं.
आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्यांचं टोकाचं पाऊल
शेतकरी सततच्या आस्मानी संकटाने हतबल झाला आहे. सणासुदीचे दिवस असल्याने कुटुंबाच्या काही गरजा आहेत. पण अतिवृष्टीमुळे हातचे पीक निघून गेलंय. त्याममुळे निर्माण झालेल्या आर्थिक विवंचनेने अनेक शेतकरी हताश झाले आहेत. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. मात्र ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी 2022 चे वर्ष उजळावे लागणार की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यातच सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या अनास्था यामुळे शेतकरी टोकाचं पाऊल उचलत आहेत.
बीड जिल्हा कृषी विभागातील पोखरा योजनेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्याप त्यांचे संपर्क होऊ शकला नाही. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जेऊरकर यांना संपर्क केला. मात्र त्यांचा फोन नॉटरिचेबल आहे.
हेही वाचा :
ना डॉक्टर ना कुठली पदवी तरीही शरीरयष्टीसाठी इंजेक्शनचा डोस, पिंपरीत चौघांना अटक