मानवतेला काळीमा फासणारी घटना, 9 महिन्यांपासून 14 वर्षीय लेकीवर वारंवार बलात्कार, नराधम बापाला बेड्या
पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा नारायणपूर परिसरात मानवतेला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. नराधम बाप त्याच्या 14 वर्षांच्या मुलीवर गेल्या 9 महिन्यांपासून बलात्कार करत होता.
मुंबई : पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा नारायणपूर परिसरात मानवतेला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. नराधम बाप त्याच्या 14 वर्षांच्या मुलीवर गेल्या 9 महिन्यांपासून बलात्कार करत होता. दुर्गापूजेच्या वेळी मुलगी आजीच्या घरी गेली असता आजीला जराशी कुणकुण लागली. त्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आला. त्यानंतर चिमुरडीच्या आईने आणि आजीने नराधमाची पोलिस ठाण्यात तक्रार केली. आरोपी असीम कुमार साहा याला पोलिसांनी अटक केली आहे.
नारायणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनोरंजन पल्ली येथे ही हादरवून सोडणारी घटना घडली आहे. याप्रकरणी नारायणपूर पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मंगळवारी त्याला बॅरकपूर कोर्टात हजर केले असता, त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
19 वर्षांपूर्वी लग्न, पत्नी आजारी होती
पीडितेच्या आईच्या म्हणण्यानुसार, त्यांचा 19 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. डॉक्टरांच्या सल्ल्याने ती बेड रेस्टवर होती. मार्च महिन्यापासून तिचा नवरा आपल्याच मुलीवर बलात्कार करत होता. या संपूर्ण प्रकरणाची माहिती असतानाही हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप महिलेने तिच्या सासू-सासरे आणि वहिनीवर केला आहे. मुलीने वडिलांच्या कृत्याबद्दल घरी सांगितले तेव्हा तिलाच उलट धमकी दिली गेली की पोलिसांकडे तक्रार केली किंवा बाहेर कुठे वाच्यता केली तर अवघड होईल.
दुर्गापूजेवेळी पीडितेने आजीला वडिलांचं काळं कृत्य सांगितलं
दुर्गापूजेला मुलगी मामाच्या घरी भेटायला गेली असता मामाच्या घरच्यांना तिला पाहून संशय आला. चौकशी केल्यानंतर तिने वडिलांचं काळे कृत्य सांगायला सुरवात केली. त्यानंतर आजीने सर्व माहिती पीडितेच्या आईला दिली. आईने पतीच्या विरोधात जाऊन आपल्या मुलीच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर संबंधित तक्रार नारायणपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आणि वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी असीमकुमार साहा याला सोमवारी रात्री अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
हे ही वाचा :
एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करुन मृतदेह पुरले, पोलिसांकडून 4 जणांना बेड्या
औरंगाबादः मुकुंदवाडीतील तरुणीचा नोकरानेच केला खून, प्रेमसंबंधातून हत्या झाल्याचे उघड
बहीण-भावाच्या अंगावर पाण्याची टाकी कोसळली; नाशिकमध्ये 4 वर्षांची मुलगी ठार