Jaipur-Mumbai Train Firing | ट्रेनमध्ये गोळीबाराचा थरार, 4 ठार, कृष्ण कुमारने जे पाहिलं ते भयानक
Jaipur-Mumbai Train Firing | मुंबईला येणाऱ्या जयपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये आज पहाटेच्या सुमारास गोळीबार झाला. यात आरपीएफचे एएसआयसह तीन प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
मुंबई : जयपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये आज पहाटेच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. एस्कॉर्ट ड्युटीवर असलेल्या आरपीएफच्या कॉन्स्टेबल चेतन याने गोळीबार केला. त्यात आरपीएफचे एएसआय टीका राम यांच्यासह तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. पालघर रेल्वे स्थानकाजवळ पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली. आरोपी कॉन्स्टेबलला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सध्या बोरीवली स्थानकात आरोपीची चौकशी सुरु आहे. सध्या जयपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेन मुंबई सेंट्रल स्थानकात पोहोचली आहे. जयपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमधील चारही मृतदेह शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. रेल्वे पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरु केली आहे.
क्रृष्ण कुमारने काय पाहिलं?
दरम्यान गोळीबाराची घटना घडली, त्यावेळी तिथे असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी काय पाहिलं? ते जाणून घेऊया. क्रृष्ण कुमार शुक्ला जयपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये काम करतात. “ही पहाटे 5 वाजताची घटना आहे. गोळीबाराचा आवाज ऐकून जाग आली. गोळी झाडणाऱ्याच्या हातात बंदूक होती. सदर पोलीस एस्कॉर्ट ड्युटीवर यायचे” असं क्रृष्ण कुमार शुक्ला यांनी सांगितलं. कॉन्स्टेबलला कोणी पकडलं का?
भांडण वैगेरे तुम्ही पाहिलं होतं का? त्यावर क्रृष्ण कुमार यांनी गोळीबाराचा आवाज ऐकून मी उठलो असं सांगितलं. “आरपीएफ कॉन्स्टेबलला कोणी पकडल नाही, तो बंदुक घेऊ इथे-तिथे फिरत होता. त्याने दुसऱ्या प्रवाशांवर सुद्धा गोळी झाडली” असं क्रृष्ण कुमार शुक्ला यांनी सांगितलं.