पुण्यात चालले काय, सलग तिसऱ्या दिवशी गोळीबार
pune crime news: पुणे शहरात गेल्या सलग तिसऱ्या दिवशी गोळीबार झाला आहे. पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरातील भुमकर चौकात गुरुवारी पहाटे गोळीबार झाला होता. त्यानंतर येरवडा परिसरात आज गोळीबार झाला.
देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुण्यामध्ये कोयता गँगनंतर आता गोळीबार करण्याच्या घटना वाढत आहेत. सलग तिसऱ्या दिवशी पुणे शहरात गोळीबार झाला आहे. तीन दिवसांत चार गोळीबाराच्या घटनांमुळे पुणे शहर हादरले आहे. पुणे गुन्हेगारीच्या घटना वाढल्यामुळे पुणे पोलिसांसमोर नवीन आव्हान उभे राहिले आहे. पुण्यात तीन दिवसांत गोळीबाराच्या चार घटना घडल्या आहेत. आता शुक्रवारी पुन्हा गोळीबार झाला आहे. जुन्या वादातून पुणे शहरातील येरवडा परिसरात गोळीबार झाला आहे.
जुन्या वादाचा रागातून गोळीबार
जुन्या वादातून सलग तिसऱ्या दिवशी पुण्यात गोळीबार झाला आहे. पुण्यातील येरवडा परिसरात आज पहाटे पुन्हा गोळीबार करण्यात आला. जुन्या वादाचा राग मनात धरून एकावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. आकाश चंदाले याने विकी चंदाले याच्यावर गोळीबार केला आहे. गोळीबार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी पहाटे साडेतीन ते चारच्या दरम्यान येरवडा येथील अग्रेसन स्कूल समोर ही घटना घडली. दोघेही एकमेकांचे नातेवाईक असल्याचे समजते.
अशा घडल्या गोळीबाराच्या घटना
पुणे शहरातील जंगली महाराज रोडवर दोन दिवसांपूर्वी बांधकाम व्यावसायिक धीरज दिनेशचंद्र आरगडे यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर हडपसरमध्येही दोन सैनिकांमध्ये वाद झाला. त्यातून शेवाळवाडी भागात गोळीबार झाला. सुधीर रामचंद्र शेडगे याने जयवंत खलाटे यांच्यावर गोळीबार केला. तिसऱ्या घटनेत कडीपेटी मागितल्याच्या कारणातून गणेश गायकवाड यांच्यावर सिंहगड रोड परिसरात गोळीबार झाला होता. आता चौथ्या घटनेत आकाश चंदाले याने विकी चंदाले याच्यावर गोळीबार केला आहे.
नऊ टोळ्यांना ‘मोक्का’चा
पुणे पोलीस गुन्हेगारी अटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. गेल्या साडेतीन महिन्यांत नऊ टोळ्यांना ‘मोक्का’चा दणका दिला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील संघटीत गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी पोलिसांकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. चालू वर्षात नऊ गुन्हेगारी टोळ्यांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. एकूण 42 गुन्हेगारांचा समावेश आहे.
लोकसभा निवडणूक भयमुक्त,शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधक कारवायांचा जोर वाढवला आहे. लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे, जाणूनबुजून जीवित व वित्तहानीसारखे गुन्हे करणाऱ्यांची कुंडली काढून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जात आहेत. चालू वर्षात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नऊ टोळ्यांमधील 42 आरोपींवर मोकाअंतर्गत कारवाई केली आहे.