शेवटचा मेसेज पाठवून ती गायब झाली, मुलगी गेल्याच्या दु:खात आई रडली…. मग आधार कार्डने उलगडलं रहस्य !
आपण जीव देत असल्याचा मेसेज करत एक अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाली. कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी खूप शोध घेतला पण त्या मुलीचा काहीच पत्ता लागला नाही. अखेर ९ महिन्यांनी...

भोपाळ : नर्मदेत उडी घेऊन मी जीव देत आहे. माझी हाडेही सापडणार नाहीत… एक १६ वर्षांची मुलगी तिच्या कुटुंबीयांना हा संदेश (message) पाठवून बेपत्ता झाली. या मेसेजने घरच हादरले, मुलीचा खूप शोधही घेतला पण ती काही सापडली नाही. याप्रकरणी पोलिसांतही तक्रार दाखल केली पण मुलीला शोधण्यात यश मिळाले नाही. आपली मुलगी आता या जगात नाही, असा विचार करून सर्व कुटुंबिय दु:खात बुडाले. ही मुलगी आता या जगात नाही, हे पोलिसांनाही (police) समजले, मात्र तरुणीच्या आईला खात्री होती की, आपली मुलगी अजूनही जिवंत आहे.
या घटनेच्या बरोबर नऊ महिन्यांनी असे काही घडले की सर्वजण अवाक् झाले. मे 2023 मध्ये त्या तरूणीच्या आईच्या मोबाईलवर एक मेसेज आला , तो पाहून सर्वांनाच धक्का बसला. काही महिन्यांपूर्वी जी मुलगी गायब झाली तिने तिचे आधार कार्ड अपडेट केले आहे, असा तो मेसेज होता. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचे धक्कादायक वास्तव समोर आले.
खरंतर ती तरूणी घर सोडून गायब झाली आणि तिच्या मित्रासोबत आसाममधील गुवाहाटी येथे गेली होती. यानंतर भोपाळ पोलिसांनी कारवाई करत तिला गुवाहाटी येथून ताब्यात घेतले. आरोपी तरुणालाही ताब्यात घेण्यात आले. कुटुंबाची दिशाभूल करण्यासाठी मुलीने असा मेसेज पाठवल्याची माहिती मिळाली.
कुटुंबियांनी पोलिसांत दाखल केली होती तक्रार
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 1 जून 2022 रोजी गोविंदपूर परिसरात राहणाऱ्या एका महिलेने आपली 16 वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. या मुलीला कोणीतरी फूस लावून सोबत नेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. मुलीने तिच्या आईच्या मोबाईलवर मेसेजही केला होता. त्यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला. मोबाईलचे लोकेशन ट्रेस केले, पण काहीही सापडले नाही.
आधार अपडेटने केली पोलखोल
घटनेच्या बरोबर 9 महिन्यांनंतर मुलीच्या आईला तिच्या फोनवर आधार कार्ड अपडेटचा मेसेज आला. वास्तविक, मुलीने तिचे वय आधारमध्ये अपडेट करण्याची प्रक्रिया केली होती, परंतु तिचा आधार तिच्या आईच्या नंबरशी लिंक करण्यात आला होता हे ती विसरली होती. यानंतर महिलेने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. मुलीने तिचे जुने सिम तोडले होते. त्यांनी नवीन सिमद्वारे आधार अपडेट करण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी लोकेशन ट्रेस करून त्या मुलीला गुवाहाटी येथून ताब्यात जप्त केले.