क्रूरतेचा कळस! चाळीस वेळा चावला, नवऱ्यानंच अंकिताचा जीव घेतला
अंकिता बाळाचे कपडे धुण्यासाठी बाथरुममध्ये गेली असताना पाय घसरुन जिन्यावरुन खाली पडली आणि जखमी झाली, असं सागरने पोलिसांना सांगितलं. मात्र पोस्टमार्टमवेळी अंकिताच्या शरीरावर 40 हून अधिक जखमा आढळल्या
पणजी : 29 वर्षीय पत्नीची हत्या केल्याप्रकरणी संशयित पतीला अटक करण्यात आली आहे. गोव्यातील रावणफोंड-मडगाव येथील रहिवासी सागर तिंबाडिया याला मडगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मयत अंकिताच्या मृतदेहावर चाळीसहून अधिक जखमा आढळल्या असून शरीरावर चावल्याचे व्रण असल्याचेही पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये उघडकीस आले आहे. लग्नानंतर अवघ्या दोन वर्षांतच अंकिताचा संशयास्पद मृत्यू झाल्याने गूढ निर्माण झाले आहे.
काय आहे प्रकरण?
रावणफोंड-मडगाव भागातील नालंदा अपार्टमेंटमध्ये सागर आणि अंकिता तिंबाडिया हे दाम्पत्य राहत होते. नऊ डिसेंबरला मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास अंकिताला दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी ती अत्यवस्थ होती. डॉक्टरांनी तपासणी करुन तिाल मृत घोषित केले.
अंकिताच्या शरीरावर 40 हून अधिक जखमा
अंकिता बाळाचे कपडे धुण्यासाठी बाथरुममध्ये गेली असताना पाय घसरुन जिन्यावरुन खाली पडली आणि जखमी झाली, असं सागरने पोलिसांना सांगितलं. मात्र पोस्टमार्टमवेळी अंकिताच्या शरीरावर 40 हून अधिक जखमा आढळल्या. तसंच तिच्या शरीरावर चावा घेतल्याचे व्रणही आढळले. त्यामुळे शारीरिक छळानंतर तिची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आला.
संशयित पती सागर तिंबाडिया मूळ गुजरातमधील बगासरा येथील आहे. त्याचा सिरॅमिक टाईल्सचा व्यवसाय आहे. तो सध्या मडगावमध्ये राहतो. काही दिवसांपूर्वीच तो गुजरातला जाऊन आला होता.
अंकिताला बिल्डिंगवरुन ढकलून देण्याची धमकी
अंकिता ही सागरची दुसरी पत्नी आहे. याआधी सागरने अंकिताला बिल्डिंगवरुन ढकलून देण्याची धमकी दिली होती, असा दावा अंकिताच्या भावाने केल्याचं पोलिसांनी सांगितलं. लग्नानंतर केवळ दोनच वर्षांत अंकिताचा संशयास्पद मृत्यू झाल्याने पोलिसांचा संशय बळावला. गुरुवारी सकाळी सागरला अटक केली असून अधिक तपास सुरु केला आहे.
संबंधित बातम्या :
Aurangabad Suicide | स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या 22 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या
सावत्र बापानं सांगितलं मुलगा कोरोनानं गेला, इकडे कॉलनीतल्या तरुणांना काय दिसलं?
अश्लील व्हिडीओ कॉल करुन ब्लॅकमेल, शिवसेना आमदार प्रकाश सुर्वेंची पोलिसात तक्रार