Video : ‘हे बिहार आहे, इथं मुलींची औकात…’ ग्रॅच्युएट चायवाली फेम मुलीचा आक्रोश
ग्रॅच्युएट चायवाली फेम प्रियंका गुप्ता जे प्रश्न विचारते, हे अस्वस्थ करायला लावणारे आहेत
बिहार : बिहारची राजधानी पटना (Patana) मध्ये प्रियंका गुप्ता नावाची मुलगी ग्रॅच्युएट चायवाली (Graduate Chai wali) म्हणून प्रसिद्ध आहे. या मुलीचा ढसाढसा रडत प्रश्न विचारत असतानाचा एक व्हिडीओ व्हायरल (Priyanka Gupta Video) झाला आहे. या व्हिडीओमध्ये गॅच्युएट चायवाली मुलगी बिहारमधील मुलींच्या सन्मानावर सवाल उपस्थित करताना दिसली. बिहारमध्ये मुलींनी स्वावलंबी होणं, म्हणजे जणू एक प्रकारचा गुन्हा आहे, असा आक्रोश तिने व्हिडीओतून व्यक्त केला. या व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता नेमकं प्रकरण काय आहे, असा प्रश्नही उपस्थित केला जाऊ लागलाय.
नेमकं काय आहे प्रकरण?
पटना इथं असलेल्या एका मुलींच्या महाविद्यालयाबाहेर प्रियंका चहाचा स्टॉल चालवते. या स्टॉलवर स्थानिक प्रशासनाने कारवाई केली. हा स्टॉल बेकायदेशीरपणे लावण्यात आला असल्याचा ठपका ठेवत स्टॉलचं साहित्य जप्त केलं. त्यानंतर खचलेल्या प्रियंकाने व्हिडीओ काढून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिलीय.
आधी पाहा प्रियंकाचा व्हिडीओ
‘हम अपनी हद भूल गए थे. ये बिहार है बिहार. यहां लड़कियों की औकात बस इतनी होती है…’ #Bihar की #GraduateChaiwali का दर्द सुनिए #PriyankaGupta pic.twitter.com/sG2q3FvhCM
— Ratnapriya (@ratnapriya91) November 15, 2022
दरम्यान, हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अखेर प्रशासनही नरमलं. प्रशासनाच्या वतीने प्रियंकाचं जप्त केलेलं स्टॉलचं सगळं सामान पुन्हा देण्यात आलंय. तसंच तिला नवी जागाही देण्यात आलीय.
या संपूर्ण प्रकरणी ग्रॅच्युएट चायवाली म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रियंकाने तिला मदत करणाऱ्या सगळ्यांचे आभारही मानलेत. ज्यांनी ज्यांनी कठीण काळात प्रियंकाला सहकार्य केलं, त्या सगळ्यांप्रती तिने कृतज्ञता व्यक्त केली.
View this post on Instagram
प्रियंका गुप्ता ही तरुणी गेल्या तीन वर्षांपासून चहाचा स्टॉल चालवते. कॉलेज झाल्यानंतर तिने प्रेरणा घेऊन स्वतः चहाचा धंदा सुरु करण्याचा निर्णय घेतला. तिनं इकॉनॉमिक्स या विषयात पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं. वुमन्स कॉलेजजवळ चहा विकणारी प्रियंका अल्पावधितच ग्रॅच्युएट चायवाली म्हणून प्रसिद्ध झाली होती. तिच्याकडे कॉलेजच्या अनेक विद्यार्थीनी चहा पिण्यासाठी येत असतात.
सोशल मीडियात एक्टिव असणाऱ्या प्रियंका गुप्ताच्या स्टॉलवर कारवाई झाल्यानंतर ती फार खचली होती. व्यवसाय करु पाहणाऱ्या बिहारमधील स्त्रियांना सन्मानाची वागणूक दिली जात नसल्याचा आरोप तिने व्हिडीओ केला होता. रविवारी रात्री तिच्या स्टॉलवर कारवाई करण्यात आली होती.
दरम्यान, याआधीही एकदा तिच्या स्टॉलवर कारवाई करण्यात आली. तेव्हा प्रियंकाने राबडी देवी यांच्या निवासस्थानी लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली होती. त्यानंतर तिला पुन्हा एकदा स्टॉल उभा करण्यासाठी मदत मिळाली होती. मात्र आता पुन्हा एकदा स्टॉलवर कारवाई करण्यात आल्यानंतर तिचा आत्मविश्वासच गळून गेला होता.
त्यातूनच प्रियंकाने व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. मुलींना समाजात व्यवसाय करण्यासाठी कशाप्रकारे रोखलं जातं, त्यांना त्यांची लायकी दाखवून देण्यासाठी अडथळे आणले जातात आणि चूल-मूल विचारांचा कसा पुरस्कार केला जातो, यावरुन प्रियंकाने संताप व्यक्त केला होता.