बायको म्हणाली नवऱ्याचा बाथरुममध्ये पडून मृत्यू, पोस्टमार्टमनंतर समजलं 17 वर्षांच्या मुलाने वडिलांना संपवलं
कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांना सांगितले की, संबंधित व्यक्ती बाथरुमच्या जमिनीवर पडली आणि जखमी झाली. न्यू सिव्हिल हॉस्पिटलमधील फॉरेन्सिक सायन्स विभागाच्या डॉक्टरांनी गुरुवारी पोस्टमॉर्टम केले आणि त्या व्यक्तीचा मृत्यू गळा दाबून झाला असल्याचे आढळले.
गांधीनगर : मोबाईल फोनवर गेम खेळल्याच्या कारणावरुन ओरडल्याने अल्पवयीन मुलाने वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना गुजरातमध्ये उघडकीस आली आहे. 17 वर्षीय मुलाने आपल्या वडिलांची गळा दाबून हत्या केल्याचा आरोप आहे. अल्पवयीन आरोपीची रवानगी पोलिसांनी बालसुधारगृहात केली आहे.
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी एक महिला तिच्या किशोरवयीन मुलासह तिच्या पतीला नवीन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन आली होती. डॉक्टरांनी मृतदेहाची तपासणी करून मृत घोषित केले.
बाथरुममधून पडून मृत्यूचा बनाव
डॉक्टरांनी कळवल्यानंतर इच्छापूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी हॉस्पिटलमध्ये आले. कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांना सांगितले की, संबंधित व्यक्ती बाथरुमच्या जमिनीवर पडली आणि जखमी झाली. न्यू सिव्हिल हॉस्पिटलमधील फॉरेन्सिक सायन्स विभागाच्या डॉक्टरांनी गुरुवारी पोस्टमॉर्टम केले आणि त्या व्यक्तीचा मृत्यू गळा दाबून झाला असल्याचे आढळले.
वडिलांच्या हत्येची कबुली
चौकशी केली असता, अल्पवयीन मुलाने आपल्या वडिलांची हत्या केल्याची कबुली दिली. इच्छापूर पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले, गुरुवारी दुपारी त्याचा जबाब नोंदवण्यात आला आणि नंतर त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले.
मोबाईलवर गेम खेळण्यावरुन वाद
इच्छापूरचे पोलीस निरीक्षक एन एस देसाई यांनी सांगितले, “मुलगा वारंवार मोबाईलवर गेम खेळत असे. बुधवारी दुपारी जेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला यावरुन फटकारले तेव्हा वडील आणि मुलामध्ये जोरदार वादावादी झाली. यानंतर मुलाने वडिलांची गळा दाबून हत्या केली.
पश्चिम बंगालचे कुटुंब, सुरतमध्ये स्थायिक
संबंधित कुटुंब मूळ पश्चिम बंगालचे आहे. मात्र ते गेल्या 17 वर्षांपासून सुरतमध्ये राहते. मृत व्यक्ती गेल्या चार महिन्यांपासून बेरोजगार होता, तर त्याची पत्नी हजीरा येथील एका कंपनीत काम करत होती.
बीडमध्ये चुलत भावांसोबत वडिलांची हत्या
दरम्यान, बँकेतील पैशाच्या व्यवहारातून मुलाने वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्येनंतर मुलाने वडिलांचे अंत्यसंस्कारही घाईघाईत उरकले. पण पोलिसांना एक निनावी फोन गेला आणि हत्येचं बिंग फुटलं. या प्रकरणी बीडमधील पाच जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मध्य प्रदेशात मुलीकडून वडिलांची हत्या
दुसरीकडे, मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्येच 58 वर्षीय व्यक्तीची राहत्या घरी गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. दहा दिवसांनंतर या प्रकरणाचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. प्रेम प्रकरणावर नाराज असलेल्या वडिलांची मुलीनेच हत्या घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वडिलांनी आपल्या बॉयफ्रेण्डला मारहाण केल्याचा राग मुलीच्या मनात धुमसत होता.
संबंधित बातम्या :
साठवलेले 1500 रुपये वडिलांनी खर्च केल्याचा राग, लोखंडी दांड्याने मारहाण करुन मुलाकडून हत्या
मुलाची हत्या करुन आईने मृतदेह घरातच पुरला, नवीन टाईल्समुळे आत्याला सुगावा