Mumbai Crime : माझगाव परिसरात रेस्टॉरंटजवळ गोळीबार, कोणीही जखमी नाही
मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. माझगाव परिसरात गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. माझगावमधील अफजल रेस्टॉरंट परिसरात हा गोळीबार झाला. सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही.
मुंबई | 18 नोव्हेंबर 2023 : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. माझगाव परिसरात गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. माझगावमधील अफजल रेस्टॉरंट परिसरात हा गोळीबार झाला. सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही. मात्र या गोळीबारामुळे परिसरात एकच खळबळ माजली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भायखळा पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केल्याचे समजते. गोळीबार का करण्यात आला याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी दहशत पसरवण्यासाठी गोळीबार केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे 3.30 – 4 च्या दरम्यान हा गोळीबार झाला. माझगाव येथील अफजल रेस्टॉरंट जवळच्या परिसरात अज्ञांतानी गोळीबार केला आहे. दहशत पसरवण्यासाठी हा गोळीबार केला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ज्याच्यावर गोळी झाडण्यात आली ती व्यक्ती त्या परिसरातील दुकानांजवळ फूटपाथवर झोपली होती. शनिवारी पहाटे 3.30 – 4 च्या सुमारास दोन आरोपी ॲक्टिव्हावरून त्या परिसरात आले आणि फुटपाथवर झोपलेल्या एका व्यक्तीवर त्यांनी गोळी झाडली. मात्र सुदैवाने त्याला ही गोळी लागली नाही. पण पळताना तो जखमी झाल्याचे समजते. त्याच्यावर नजीकच्या रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.
गोळीबार झाल्यानंतर आरोपी हे घटनास्थळावरून तत्काळ फरार झाले. हा गोळीबार कोणी केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भायखळा आणि इतर परिसरातील पोलिसांनी या घटनेतील आरोपींना शोधण्यासाठी पथके तयार केली आहेत. परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे पोलिस आरोपींचा शोध घेत आहे. परिसरात या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे.