चंदिगढ : गुरुग्राममध्ये ऐन दिवाळीच्या दिवशी फटाक्याच्या नाही, तर खऱ्याखुऱ्या बंदुकीचा गोळीबार झाला. घरात घुसून एकाच कुटुंबातील सहा जणांवर आरोपींनी हल्ला केला. अंतर्गत वादातून माजी सरपंचाच्या घरी हा प्रकार घडल्याची माहिती आहे. गोळीबारात 21 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला, तर पाच जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींपैकी दोघा जणांची प्रकृती गंभीर असल्याचं बोललं जातं.
नेमकं काय घडलं?
गुरुग्राममधील मानेसर परिसरात कासन गावात लक्ष्मीपूजनाच्या रात्री जवळपास साडेआठ वाजता ही घटना घडली. माजी सरपंचाच्या कुटुंबाच्या घरी लक्ष्मीपूजन सुरु होतं. त्याच वेळी आरोपींनी त्यांच्या घरात घुसून अंदाधुंद गोळीबाराला सुरुवात केली. त्यापैकी एक गोळी कुटुंबातील पाळीव कुत्र्यालाही लागली. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले.
हल्ल्यात आठ वर्षांचा मुलगा जखमी
हल्ल्यात आठ वर्षांचा मुलगाही जखमी झाला आहे. त्याच्या हाताला गोळी लागली. रिंकू नावाच्या युवकाने हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. माजी सरपंचाच्या कुटुंबासोबत पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा दावा केला जात आहे.
2007 मध्ये होळीच्या दिवशी रिंकूच्या कुटुंबातील एका सदस्याची हत्या करण्यात आली होती. त्याचा सूड उगवण्यासाठी रिंकूने माजी सरपंचाच्या कुटुंबीयांवर हल्ला केल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.
21 वर्षांच्या तरुणाला 15-20 गोळ्या
21 वर्षांच्या विकास राघवला हल्ल्यात 15 ते 20 गोळ्या लागल्या. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. कुटुंबातील इतर पाच सदस्यांना प्रत्येकी दोन-तीन गोळ्या लागल्या आहेत. पाच जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींपैकी दोघा जणांची प्रकृती गंभीर असल्याचं बोललं जातं.
2007 मधील हत्याकांडाचा सूड घेण्यासाठी रिंकूने या कुटुंबावर आतापर्यंत तीन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाईल, असा दावा पोलिसांनी केला आहे.
संबंधित बातम्या :
कंपनीला गाडी लावतो, भाड्यावरील 250 गाड्या परस्पर गहाण, पुण्यात माजी उपसरपंचाला बेड्या
पालकांनो मुलांकडे लक्ष द्या! तीन वर्षांच्या लेकराने फटाका गिळला, अतिसाराने मृत्यू