पोटच्या मुलीवर वाईट नजर ठेवल्याचा राग, प्रियकराला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं
पवनची एका महिलेशी मैत्री असल्याची जितेंद्रला माहिती होती. त्याने महिलेला फोन करुन विचारणा केली असता तिने सांगितले की तो तिच्याकडे आला होता पण तो लॅपटॉप आणि कार सोडून संध्याकाळी चार वाजताच्या सुमारासच निघून गेला.
चंदिगढ : हरियाणातील फरिदाबाद क्राइम ब्रँच 65 आणि वल्लभगढ पोलिस स्टेशनच्या पथकाने 10 दिवसांपूर्वी बीपीटीपी परिसरात सापडलेल्या अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाची ओळख पटवत हत्येचे गूढ उकलले आहे. जळलेल्या अवस्थेतील तरुणाला पाहून तो नायजेरियन नागरिक असल्याचं वाटत होतं. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून शव विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला होता. तपासात हा मृतदेह वल्लभगढच्या भाटिया कॉलनीतील रहिवासी असलेल्या पवनचा असल्याचे समोर आले. मृत पवनचा धाकटा भाऊ जितेंद्रने पवन बेपत्ता झाल्याची तक्रार 18 ऑक्टोबर रोजी वल्लभगढ पोलीस ठाण्यात दिली होती. पवन कुरिअर कंपनीत काम करत होता. 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पवन ड्युटीसाठी घराबाहेर पडला होता, मात्र संध्याकाळी घरी न परतल्याने कुटुंबीयांना त्याची काळजी वाटू लागली होती.
पवनच्या मैत्रिणीकडे चौकशी
पवनची एका महिलेशी मैत्री असल्याची जितेंद्रला माहिती होती. त्याने महिलेला फोन करुन विचारणा केली असता तिने सांगितले की तो तिच्याकडे आला होता पण तो लॅपटॉप आणि कार सोडून संध्याकाळी चार वाजताच्या सुमारासच निघून गेला. यानंतर जितेंद्रने पवनची कंपनी, मित्र आणि नातेवाईकांकडे चौकशी केली, मात्र त्याचा पत्ता लागला नाही. जितेंद्रच्या तक्रारीवरून बेपत्ता असल्याचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरू होता. दुसरीकडे पोलीस ठाण्याचे बीपीटीपीचे पथक अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यात गुंतले होते.
फरीदाबादमध्ये राहणाऱ्या अनेक नायजेरियन नागरिकांना मृताचा फोटो दाखवला, मात्र मृत व्यक्तीची ओळख पटली नाही. या प्रकरणाची तातडीने दखल घेत पोलीस आयुक्त विकास अरोरा यांनी पवनचा लवकरात लवकर शोध घेण्याचे निर्देश दिले. पोलिस स्टेशन बीपीटीपी परिसरात सापडलेला मृतदेह पवनचा असल्याचे गुन्हे शाखा 65 आणि पोलिस स्टेशन वल्लभगढच्या पोलिस पथकाला आढळून आले. पोलीस चौकशीत ही महिला पंजाबची रहिवासी असल्याचे समोर आले आहे.
पवन आणि आरोपी महिला लिव्ह-इनमध्ये
आरोपी महिलेचा पती फरीदाबाद आयएमटी येथील एका खासगी कंपनीत कामाला होता. 2018 मध्ये ब्लड कॅन्सरमुळे त्यांचे निधन झाले. 2019 मध्ये पतीच्या जागी महिलेला नोकरी लागली. 2019 मध्ये ही महिला पवनला भेटली, त्यानंतर दोघेही प्रेमात पडले आणि दोघेही वल्लभगढमध्ये लिव्ह-इनमध्ये राहत होते. मृत पवनने आरोपी महिलेच्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर घाणेरडी नजर ठेवण्यास सुरुवात केली, ही बाब महिलेच्या लक्षात आली.
या प्रकरणावरून महिलेला पवनचा प्रचंड राग आल्याने त्यांच्यात वादावादी झाली. या वादाने पुढे हाणामारीचे रूप धारण केले. यामुळे महिलेने पवनला मारण्याचा कट रचला. हत्येच्या काही दिवसांपूर्वी तिने बाटलीत पेट्रोल आणून ठेवले होते. 16 ऑक्टोबर रोजी महिलेने पवनला झोपेची गोळी खाऊ घातली आणि त्याला रिक्षामध्ये बसवून बराच वेळ फिरत राहिली. रात्री 10.30 वाजताच्या सुमारास ती त्याला घेऊन सेक्टर 75 मधील निर्जन ठिकाणी गेली. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास महिलेने पवनवर पेट्रोल टाकून त्याला पेटवून दिले आणि घटनास्थळावरून फरार झाली.
संबंधित बातम्या
मुंबईत आणखी एका सायको किलरची दहशत, 15 मिनिटात दगडाने ठेचून दोघा जणांची हत्या
आधी भावाचा हार्ट अटॅकने मृत्यू, आता पाळीव बैलाचा बापलेकावर हल्ला, आठवड्याभरात दोन आधार हरपले