मुंबई : आरोग्य विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत मोठा गोंधळ उडाला. परीक्षेसाठीच्या प्रवेशपत्रापासून ते प्रश्नपत्रिकेपर्यंत मोठी धांदल उडाल्याचे समोर आले. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांकडून पेपर फुटल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर आता या प्रकरणातील एका आरोपीस पुणे पोलिसांनी अटक केले आहे. विजय मुराडे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोग्य विभागात उडालेल्या गोंधळांनतर विद्यार्थी पुण्यातील राहुल कवठेकर व आरोग्य विभागाने सायबर पोलिसांकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी विजय प्रल्हाद मुराडे वय वर्ष 29 या एका आरोपीला अटक केले आहे. तो मुळचा जालना जिल्ह्यातील रहिवाशी आहे. त्याला पुणे पोलिसांच्या सायबर सेलने औरंगाबादमधून अटक केली आहे. अटकेनंतर पोलिसांनी त्याला शिवाजीनगर कोर्टात हजर केले होते. न्यायालयाने आरोपीस 7 दिवसांची पोलीस कोठडी दिली असून पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.
आरोग्य विभागातील 6 हजार पदांसाठी आयोजित करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेतील गोंधळ उच्च न्यायालयात पोहोचला आहे. आरोग्य विभागाकडून गट क आणि गट ड संवर्गातील पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. पण गोंधळ उडाल्यामुळे दोन वेळा ही परीक्षा पुढे ढकलावी लागली होती. त्यानंतर ही परीक्षाच रद्द करा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. त्यानंतर उच्चन्यायालयाने राज्य सरकारला नोटीस जारी होती. आपले म्हणणे तीन आठवड्यात शपथपत्राद्वारे दाखल करावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
दरम्यान, न्यासा कंपनीमार्फत गट क पदाकरिता घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका चुकीच्या देण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला. तसेच गट ड च्या प्रश्नपत्रिका गट क संवर्गासाठी आोयजित केलेल्या परीक्षेत वितरित केल्याने त्या परीक्षेपूर्वीच फुटल्याचा आक्षेप उमेदवारांनी घेतला आहे. गट क व गट ड साठी घेण्यात आलेल्या निवड परीक्षांमध्ये प्रवेश पत्र, परीक्षा केंद्र, प्रश्नपत्रिका यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला होता. सायबर पोलीस ठाणे औरंगाबाद व पुणे येथे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर रितसर गुन्हा नोंदविण्यात आला होता.
इतर बातम्या :