Hingoli | दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्या, होस्टेलच्या खोलीत गळफास, हिंगोलीत खळबळ!
तीन वाजता शाळेच्या मधल्या सुटीत सर्व मुली होस्टेलमध्ये फ्रेश होण्यासाठी जातात. शिवानीही आली. मात्र दुपारच्या सत्रात ती शाळेत गेलीच नाही. सायंकाळी पाच वाजता वॉर्डन चेकिंग करत असताना शिवानीने गळफास घेतल्याचे उघडकीस आले.
हिंगोलीः दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने आत्महत्या (Hingoli Suicide) केल्याने हिंगोलीत खळबळ माजली आहे. कळनुरी तालुक्यातील (Kalamnuri) बोथी येथे ही घटना घडली. विशेष म्हणजे शासकीय आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात हा प्रकार घडला. सदर विद्यार्थिनीने (Girl Suicide) आपल्या खोलीतच ओढणीने गळफास घेतला. गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शिवानी सदाशिव वावधने या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे वसतिगृह परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये खळबळ माजली आहे. ही विद्यार्थिनी मागील पाच वर्षांपासून या आश्रमशाळेत शिकत होती. मात्र काल अचानक तिने आत्महत्या केली. शिवानीने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समजू शकले नसले तरीही दिलेल्या तक्रारीनंतर आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि वसतीगृहाच्या वॉर्डन सविता विणकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हातावर कापल्याच्याही खुणा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील बोथी शासकीय आदिवासी आश्रमशाळेत शिवानी सदाशिव वावधने ही 16 वर्षीय विद्यार्थिनी दहावीत शिकत होती. शाळा सुरु झाल्यानंतर ही १५ जून रोजी ती वसतिगृहात आली होती. शिवानी मागील पाच वर्षांपासून येथे शिकत होती. तिचं मूळचं गाव वारंगा. काल संध्याकाळी वसतिगृहाच्या वॉर्डन सविता विणकरे नियमित तपासणी करत असताना शिवानीने आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यांनी सदर प्रकार मुख्याध्यापक किशन खांडरे यांना सांगितला. त्यानंतर आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात सदर घटनेची नोंद करण्यात आली. शिवानीने गळफास घेऊन आत्महत्या केलेली असली तरी तिच्या डाव्या हातावर ब्लेडने कापल्याच्या खुणा दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले. या खुणा कशाच्या आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.
मुख्याध्यापक आणि वॉर्डनविरोधात गुन्हा
आदिवासी आश्रमशाळेची वेळ अकरा ते पाच अशी होती. शिवानी सकाळच्या सत्रात होती. तीन वाजता शाळेच्या मधल्या सुटीत सर्व मुली होस्टेलमध्ये फ्रेश होण्यासाठी जातात. शिवानीही आली. मात्र दुपारच्या सत्रात ती शाळेत गेलीच नाही. सायंकाळी पाच वाजता वॉर्डन चेकिंग करत असताना शिवानीने गळफास घेतल्याचे उघडकीस आले. मयत मुलीचे वडील सदाशिव नागोराव वावधने यांनी दिलेल्या तक्रारीवरून आश्रमशाळेचे मुख्याध्यापक किशन इरबा खांडरे आणि वसतिगृहाच्या वॉर्डन सविता विणकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.