दिवाळीपूर्वी मृत्यूचं थैमान! टँकरच्या धडकेने कार पेटून तिघांचा मृत्यू, तर एसी बस पेटून 30 प्रवासी होरपळले
एका टँकरने कार आणि पिकअप व्हॅनला धडक दिल्याने कारला आग लागून भीषण दुर्घटना घडली. या मध्ये कारमधील तिघांचा होरपळून मृत्यू झाला. तर दुसरीकडे, एका एसी बसला आग लागून 30 प्रवासी जखमी झाल्याची दुर्घटनाही घडली.
गुरुग्राम | 11 नोव्हेंबर 2023 : सध्या सर्वत्र दिवाळीचं, आनंद, उत्साहाचं वातावरण आहे. मात्र दिवाळीच्या एक दिवस आधी गुरुग्राममध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दिल्ली – जयपूर महामार्गावर हा अपघात झाला. तेथे एका टँकरने पिकअप व्हॅन आणि कारला जोरदार धडक दिली, त्यामुळे कारने पेट घेतला आणि आत बसलेले तीन जण होरपळले. या अपघातात पिकअप व्हॅनच्या चालकाचाही मृत्यू झाला आहे. अपघातातील मृतांची ओळख पटवण्याचं काम पोलीस सध्या करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 11 वाजण्याच्या सुमारास दिल्ली जयपूर महामार्गावरील सिद्धरावली गावाजवळ जयपूरकडून एक ऑइल टँकर हायस्पीडने येत होता. मात्र चालकाचं नियंत्रण सुटल्याने टँकरने आधी डिव्हायडर तोडला आणि तो ( टँकर) दिल्लीहून जयपूरला जाणाऱ्या लाईनमध्ये घुसला. त्याचवेळी टँकरची समोरून येणाऱ्या डॅटसन गो कारशी जोरदार धडक झाली. त्या कारमध्ये सीएनजी लावण्यात आल्याने स्फोट होऊन कारला आग लागली. कारचे दरवाजे लॉक असल्याने ते उघडता न आल्याने आत बसलेल्या तीन जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.
#WATCH | Haryana: A tanker hits a car and pickup vehicle near Sidhrawali on Delhi-Jaipur Highway. Further details awaited. pic.twitter.com/RhmzpS1PKL
— ANI (@ANI) November 11, 2023
बघे व्हिडीओ बनवण्यात व्यस्त
कारला धडक बसल्यानंतर टँकरने समोरील डिव्हायडरचे ग्रील तोडले आणि समोरून येणाऱ्या आणखी एका वाहनाला, पिकअप व्हॅनला त्याची धडक बसली. ती धडक एवढी भीषण होती की पिकअप व्हॅन चालकाचाही मृत्यू झाला. आजूबाजूने जाणाऱ्या वाहनांमधीालकल प्रवाशांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पण काही लोक तर या अपघाताचे आणि जळणाऱ्या कारचे फोटो, व्हिडीओ काढण्यात व्यस्त होते.
टँकरमुळे बसलेली ही धडक जबरदस्त होती, कारण त्या पिकअप व्हॅनचा पुढून अगदी चक्काचूर झाला होता. ज्यामुळे आतमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढणे अतिशय कठीण झाले होते. पण दुर्दैवाने तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. तर दुसरीकडे पेट घेतलेल्या कारमध्ये अडकलेल्यांचाही होरपळून मृत्यू झाला. ही कार पानिपतमधील एका व्यक्तीच्या नावे रडिस्टर असल्याची माहिती पोलिसांनी नंबरप्लेटच्या आधारे दिली. कारमधील मृतांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू असून त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्यात येईल.
पश्चिम बंगालमध्ये मोठा अपघात , 30 प्रवासी होरपळले
तर दुसरीकडे पश्चिम बंगालमधील पश्चिम मेदिनीपूरमध्ये शुक्रवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. ओडिशाच्या पारादीपला जाणाऱ्या लक्झरी एसी बसला आग लागली. या अपघातात 30 प्रवासी होरपळल्याची माहिती समोर आली आहे. सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. आगीची ही दुर्दैवी घटना मादपूर येथील राष्ट्रीय महामार्ग-16 वर घडली. पण ही आग नेमकी कशामुळे लागली त्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
#WATCH | West Bengal: Fire broke out in a passenger bus at NH 16, Madpur in West Midnapore. Fire tenders are present at the spot. Further details awaited. pic.twitter.com/nF2jVa2uzc
— ANI (@ANI) November 10, 2023
आग लागल्यानंतर बस पेटू लागली. त्यामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी बसच्या खिडक्या तोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. कसेतरी सगळे बाहेर पडले. पण त्यामध्ये अनेक सर्व प्रवासी होरपळले. तर काही खाली खड्ड्यात पडले. सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याचे एसपी पोलिस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले.
त्यानंतर अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. अथक प्रयत्नांती कसेबसे आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिकांनीही मोठी मदत केली.