‘हम दिल दे चुके सनम’ रिपीट… जे सिनेमात घडलं, तेच त्यानं केलं; कहानी पूरी रियल है, फिल्मी नही…
लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात असं म्हणतात. त्यामुळे तुमची जिच्याशी लगीनगाठ बांधली गेलीय तिच्याशीच तुमचं लग्न होणार हे स्पष्टच आहे. मग भलेही तिचं लग्न दुसऱ्यासोबत झालेलं का असेना? काय? आश्चर्य वाटलं ना? कहाणी तर वाचा...
देवरिया | 24 सप्टेंबर 2023 : बऱ्याचदा सिनेमात जे घडतं तेच करण्याचा लोकांचा प्रयत्न असतो. पण ते तेवढं सोपं नसतं. कारण सिनेमातील जगणं आणि प्रत्यक्षातील जगणं फार वेगळं असतं. सिनेमाचं आयुष्य तीन तासाचं असतं. तीन तास संपले, खेळ संपला की झालं. पण खऱ्याखुऱ्या आयुष्यात तसं नसतं. पण तरीही जर एखाद्याच्या आयुष्यात सिनेमाच रिपीट झाला तर? खरं वाटत नाही ना? शक्यही वाटत नाही ना? पण तसं घडलंय. एका व्यक्तीच्या आयुष्यात चक्क हम दिल दे चुके सनम सिनेमा रिपीट झालाय. काय घडलं नेमकं असं?
उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील बरियारपूर नगर पंचायतीत हा किस्सा घडला आहे. येथील एका तरुणाने बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील भोरे येथील तरुणीशी लग्न केलं होतं. वर्षभरापूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं. शुक्रवारी रात्री या तरुणीचा प्रियकर तिला भेटायला बिहारहून थेट उत्तर प्रदेशात आला. रात्रीचा फायदा घेत तो तिला भेटला. पण अचानक या दोघांना भेटताना पकडण्यात आलं. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. गलका झाल्याने गावातील लोक जागे झाले आणि या तरुणाच्या घरासमोर एकच गर्दी झाली. काही लोकांनी बिहारहून आलेल्या या तरुणाला बेदम मारहाणही केली.
बेदम मारहाण पाहून ती…
बिहारहून आलेल्या आपल्या प्रियकराला बेदम मार खाताना पाहून ही तरुणी जोरजोरात ओरडायला लागली. रडायला लागली. त्याला सोडा म्हणून नवऱ्याला विनवणी करू लागली. पत्नीचा आक्रोश आणि विव्हळणं पाहून नवऱ्याच्याही काळजाला पाझर फुटला. त्याच्या मनात एक विचार चमकून गेला अन् पत्नीचा तिच्या प्रियकराशी विवाह लावून देण्याचा त्याने निर्णय घेतला.
दोन्ही कुटुंबांचं मन वळवलं
त्यानंतर या तरुणीच्या नवऱ्याने त्याच्या घरच्यांना आपला निर्णय सांगितला. त्यांची मानसिकता तयार केली. त्यानंतर तो सासूरवाडीत गेला. सासूरवाडीतील लोकांनाही समजावलं. त्यांचंही मन वळवलं. दोन्ही कुटुंबातील लोकांनी होकार दिल्यानंतर त्याने पत्नीचं आणि या तरुणाचं गावातील मंदिरात लग्न लावून दिलं. त्यानंतर दोघांनाही निरोप दिला. हम दिल दे चुके सनम सिनेमात जे घडलं, तेच लोक प्रत्यक्षात घडताना पाहत होते. त्यांचा त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता.
दोन वर्षापासून प्रेमप्रकरण
बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातील भोरे येथील रेडवरिया गावात राहणाऱ्या या तरुणाचं नाव आकाश शाह असं आहे. त्यांचं भोरेमध्ये राहणाऱ्या या तरुणीशी दोन वर्षापासून प्रेमप्रकरण सुरू होतं. आकाश वेल्डिंगचं छोटंमोठं काम करतो. मात्र, या तरुणीचा विवाह उत्तर प्रदेशातील तरुणासोबत ठरला. प्रेयसीचं लग्न झाल्यापासून त्याचं कामात मन लागत नव्हतं. तो सैरभैर झाला होता. त्यामुळे त्याने अखेर प्रेयसीला तिच्या सासरी जाऊन भेटण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच तो बिहारमधू न थेट उत्तर प्रदेशात पोहोचला होता.