‘त्या’ कारणामुळे पतीसोबत सासरी जाण्यास दिला नकार, म्हणून पतीने पत्नीवर चाकूनेच..
लग्नाला बरीच वर्ष झाल्यानंतरही पती-पत्नीत सतत वाद होत असत. त्याला कंटाळून पत्नी माहेरी निघून गेली.
Murder News : पतीसोबत सासरच्या घरी जाण्यास नकार देणे पत्नीच्या जीवावरच बेतले. घरी येण्यास नकार देणाऱ्या बायकोचा पतीनेच (husband killed wife) खून केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. तसेच ग्रामस्थांच्या मदतीने आरोपीला अटक करण्यात आली आहे. या हत्याकांडामुळे (murder) परिसरात दहशत पसरली असून गुन्हे थांबण्याऐवजी अनियंत्रित होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. उत्तर प्रदेशातील बांदा येथील ही धक्कादायक घटना आहे.
माहेरी रहात होती पत्नी
हे प्रकरण शहर कोतवालीच्या काहला गावाशी संबंधित आहे. तिथे राहणाऱ्या पीडित महिलेचा आरोपीशी 2016 साली विवाह झाला होता. मात्र लग्न झाल्यापासून त्या दोघांमध्ये सतत वाद होत होते, असे मृत महिलेच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. आरोपी हा काहीच कमवत नव्हता, तो फक्त दारू प्यायचा आणि महिलेशी सतत भांडायचा, असा आरोप आहे.
मृत महिला हीसुद्धा सततच वाद, भांडण यांना कंटाळली होती. त्यामुळे वैतागून ती माहेरी गेली होती. पतीदेखील तिथे पोहोचला व त्याने पत्नी घरी (सासरी) परत येण्यास सांगितले असता त्या दोघांमध्ये भांडण सुरू झाले. या भांडणाचे पर्यवसन मोठ्या वादात झाले आणि रागाच्या भरात आरोपी पतीने त्याच्या पत्नीवर चाकून सपासप वार करत तिची हत्या केली, असे पोलिसांनी सांगितले.
मृत महिलेच्या नातेवाईकांनी अनेक वेळा मध्यस्थी केली, आरोपीचीही समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अखेर त्यांना त्यांची मुलगी गमवावी लागली.
पती चाकू घेऊनच आला होता
हत्येच्या या घटनेनंतर नातेवाईकांनी आरोपीला पकडून त्याचे हातपाय बांधले. यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. जिल्ह्यातील एएसपी लक्ष्मी निवास मिश्रा यांनी सांगितले की, गिरवण पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या महिलेचा २०१६ मध्ये विवाह झाला. मात्र तिचे पतीशी सतत वाद सुरू होते.
3 ते 4 दिवसांपूर्वी ती तिच्या माहेरी आली होती, तिचा नवराही आला होता. नंतर तो परत गेला, पण घटनेच्या दिवशी तो पुन्हा तिला तिच्या सासरी नेण्यासाठी माहेरी आला होता. मात्र महिलेने त्याच्यासोबत परत जाण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि मोठे भांडण झाले. आरोपी पतीने आधीच चाकू आणला होता. पत्नीने नकार दिल्यानंतर संतापलेल्या पतीने तिच्यावक चाकूने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या महिलेचा अखेर मृत्यू झाला. आरोपीला गावकऱ्यांच्या मदतीने पकडण्यात आले व पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.