बंगळुरू : घटस्फोटा (Divorce)साठी अर्ज केल्यानंतर कौटुंबिक न्यायालयात समुपदेशना (Counselling)साठी आले असता पतीने न्यायालयातच पत्नीचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना कर्नाटकात घडली आहे. पत्नीवर हल्ला (Attack) केल्यानंतर आरोपी पतीने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे उपस्थित लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. शिवकुमार असे आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे काही मिनिटांपूर्वीच समुपदेश सत्रात दोघांनी घटस्फोट न घेता सोबत राहण्याचे मान्य केले होते. जखमी महिलेला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. चैत्रा असे मयत पत्नीचे नाव आहे.
शिवकुमार आणि चैत्रा यांचा सात वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मात्र दोघांचे पटत नसल्याने त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी हसन जिल्ह्यातील होलेनारसीपुरा कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानुसार कौटुंबिक न्यायालयात त्यांना समुपदेशन सत्रासाठी बोलावण्यात आले होते. तासाभराच्या समुपदेशनानंतर पत्नी कोर्टातून बाहेर पडत असतानाच शिवकुमारने तिच्यावर हल्ला केला. तो पत्नीच्या मागे वॉशरूममध्ये गेला आणि कुऱ्हाडीने तिचा गळा चिरला. यात जखमी चैत्राचे बरेच रक्त वाहून गेले. गुन्हा केल्यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला पकडले. चैत्राला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र घशात खोलवर जखमा झाल्याने आणि भरपूर रक्त वाहून गेल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी शिवकुमारवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हे हत्यार न्यायालयाच्या आवारात आणण्यात कसा यशस्वी झाला, याबाबत पोलीस तपास करत आहेत.
ही घटना न्यायालयाच्या आवारात घडली. आरोपीला आम्ही आमच्या ताब्यात घेतले आहे. आरोपीने गुन्ह्यात वापरलेले हत्यार आम्ही जप्त केले आहे. समुपदेशन सत्रानंतर काय झाले आणि त्याच्याकडे न्यायालयात शस्त्र कसे आले याचा तपास करू. ही पूर्वनियोजित हत्या होती का, याचाही तपास केला जाईल, असे वरिष्ठ पोलीस अधिकारी हरिराम शंकर यांनी सांगितले. (Husband kills wife with ax in family court in Karnataka)