चंदिगढ : नवीन लग्न झालेलं जोडप्यामध्ये साधारणत: पहिले दोन-तीन वर्ष फारसे वाद होत नाहीत. उलट या दोन-तीन वर्षांमध्ये त्यांच्यातील प्रेम अधिक जास्त घट्ट होत जातं. त्यानंतर त्यांच्या नात्याची शिदोरी इतकी पक्की होती की, त्यांचं जन्मोजन्मी हेच नातं असावं, असं त्यांना वाटतं. पण हरियाणाच्या सोनीपत येथून एक विचित्र घटना समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या चार महिन्यानंतर एका पतीने त्याच्या मित्रांना स्वत:च्या पत्नीच्या हत्येची सुपारी दिली. पण सुदैवाने पोलिसांच्या योग्य कारवाईमुळे पत्नीचे प्राण वाचले आहेत. पोलिसांनी आरोपी पतीला आता बेड्या ठोकल्या आहेत (Husband plots to murder wife after four months of marriage).
नेमकं प्रकरण काय?
आरोपी प्रदीपचं हैदरापूरच्या बहादूरगढमध्ये एक हॉटेल आहे. खरंतर ते हॉटेल त्याच्या काकांच्या मालकीचं आहे. पण सध्या तो ते हॉटेल चालवतो. या प्रदीपचं डिसेंबर 2020 मध्ये सीमा नावाच्या तरुणीसोबत लग्न झालं. पण लग्नानंतर काही दिवासांनी त्यांचे खटके उडायला लागले. त्यावरुन प्रदीपने आपल्या पत्नीचा काटा काढण्याचं ठरवलं. यासाठी त्याने आपल्या तीन मित्रांना तिच्या हत्येची सुपारी दिली. सीमा जेव्हा स्कूटीने सैदपूर गावातून बहादूरगढाकडे जाईल तेव्हा पिकअपने धडक देऊन तिची हत्या करायची, असा कट त्याने आखला होता. मात्र, हा कट पोलिसांनी उधळून लावला.
पोलिसांना सुपारीची माहिती कशी मिळाली?
पोलिसांचं एक पथक पिपली गावाजवळ गस्त घालत होतं. या दरम्यान तिथला रहिवासी प्रदीप हा त्याच्या पत्नीची हत्या करण्याच्या विचारात आहे. त्यासाठी त्याने तीन जणांना सुपारी दिली असून ते पिकअपने धडक देणार आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी कारवाई कशी केली?
मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी तातडीने कारवाई करण्यास सुरुवात केली. त्यांनी कुंडल गावाजवळ पिकअप पकडली. या पिकअपमध्ये आरोपीचे तीनही मित्र होते. पोलिसांनी त्यांची चौकशी केल्यानंतर आपण प्रदीपला ओळखत असून त्यानेच पत्नीच्या हत्येची सुपारी दिली होती, असा कबुली जबाब त्यांनी दिला.
आरोपींची चौकशी सुरु
पोलिसांनी तीनही आरोपींना कोर्टात सादर केलं. त्यानंतर त्यांना दोन दिवसांसाठी रिमांडवर घेतलं आहे. याशिवाय पोलिसांनी मुख्य आरोपी प्रदीपला देखील बेड्या ठोकल्या. पोलीस प्रदीपलाही कोर्टात सादर करुन त्याच्या रिमांडची मागणी करणार आहेत (Husband plots to murder wife after four months of marriage).