तो रोज स्मशानात जायचा, जीवाच्या आकांताने रडायचा, अखेर त्यानेही विपरीत केलं, मन विषण्ण करणारी घटना
छत्तीसगडच्या बालोद येथून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पत्नीच्या निधनानंतर 17 दिवसांनी पतीने देखील स्मशानभूमीत जावून स्वत:ला संपवलं आहे.
रायपूर : छत्तीसगडच्या बालोद येथून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पत्नीच्या निधनानंतर 17 दिवसांनी पतीने देखील स्मशानभूमीत जावून स्वत:ला संपवलं आहे. पत्नीच्या पार्थिवावर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले होते त्याच परिसरात त्याने बाभळाच्या झाडाला लटकून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
मृतक पतीचं नाव मनीष नेताम असं आहे. तो धमतरी जिल्ह्यातील बोरई पोलीस ठाण्यात कार्यरत होता. दोन महिन्यांपूर्वीच त्याचं हेमलता नावाच्या तरुणीसोबत लग्न झालं होतं. पण लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यांनी त्याच्या पत्नीचं घरातील फरशीवर पाय निसटून पडल्याने मृ्त्यू झाला होता. या घटनेपासून मनीष हा प्रचंड नैराश्यात गेला होता. अवघ्या दीड महिन्यांपूर्वी लग्न झालं पण देवाने असं का केलं? असा सवाल तो सारखा उपस्थित करायचा.
आत्महत्या करण्याआधी सुसाईड नोट
मनीष आणि हेमलता यांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम होतं. त्यामुळे हेमलताच्या निधनाने मनीष आतून खूप खचला होता. तो गेल्या 17 दिवसांपासून दररोज हेमलताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या ठिकाणी जावून बसायचा. तिथे तो प्रचंड रडायचा. मनीष बुधवारी (11 ऑगस्ट) देखील तिथे गेला. पण यावेळी त्याने शोकात बाभळाच्या झाडाला लटकून गळफास घेऊन आत्महत्या केली. मनीषने आत्महत्या करण्याआधी आपल्या भावाला व्हाट्सअॅपवर सुसाईड नोट पाठवली. त्याची ती नोट वाचून एकच खळबळ उडाली.
मनीषने सुसाईड नोटमध्ये नेमकं काय म्हटलं?
“आमच्या लग्नाला अवघे दोन वर्ष झाली होती. मी लताला विसरु शकत नाही. इतकी मेहमत करुन आपण सगळ्यांनी मिळून नवीन घर बनवलं, लवकर लग्नही केलं. सगळं व्यवस्थित सुरु होतं. पण परमेश्वराच्या मनात नेमकं काय होतं? त्यामुळे आता या घरात राहण्याची माझी देखील इच्छा राहिलेली नाही”, असं मनीष म्हणाला.
“छोटू, पप्पा आणि ताईंना मला माफ करायला सांग. कारण त्यांनी मला लताला सांभाळण्याची जबाबदारी दिली होती. पण मी ती जबाबदारी योग्यपणे निभावू शकलो नाही. हा फोन लताने मला गिफ्ट म्हणून दिला होता. हा फोन माझ्यानंतर छोटूने वापरावा, अशी माझी इच्छा आहे. मला माहिती आहे की तो नाही म्हणेल. पण त्याला सांगा मी सांगितलंय. माझं म्हणणं जरुर ऐकावं”, असंही त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिलं.
हेही वाचा :
आमच्या गाडीला कट का मारला? चाकणमध्ये वादात गुंतवून कारमधील 12 लाखांची चोरी
अनेक स्त्रियांशी संबंध, जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण, मनसे नेते गजानन काळेंवर पत्नीचे गंभीर आरोप