सांगली : पती-पत्नीमध्ये वाद होणं ही क्षुल्लक गोष्ट आहे. एकाच घरात राहून भांड्याला भांडं लागतं. त्यात गैर असं काहीच नाही. पण सांगलीतील एका इसमाने पत्नीवर चिडून जे कृत्य केलं त्याची चांगलीच चर्चा सुरु आहे. त्याचं झालं असं की कुपवाड येथील अकुज ड्रिमलँडमध्ये राहणाऱ्या कविता पवार यांचा चिरंजीव आदित्य नुकताच दहावी पास झालाय. आता त्याच्या अकरावी प्रवेशासाठी लगबग सुरु आहे. आदित्यच्या आईने पती तानाजी पवार यांच्याकडे मुलाच्या अकरावीच्या प्रवेशासाठी पैसे लागतील म्हणून पैसे मागितले. पण याच गोष्टीचा पतीला राग आला.
पत्नीने मुलाच्या अकरावी प्रवेशासाठी पैसे मागितले म्हणून तानाजी पवार यांनी थेट कपाटातून त्यांची परवाना असलेली रिव्हॉल्व्हर काढली. त्यांनी पत्नीला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. तसेच पतीच्या डोक्यावर रिव्हॉल्व्हर रोखून डोक्यात गोळ्या घालण्याची धमकी दिली. यावेळी कविता या घाबरल्या. त्यांना पतीच्या अशा वागणुकीचा प्रचंड राग आला. त्यांनी गुरुवारी (12 ऑगस्ट) संध्याकाळी कुपवाड एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठलं. तिथे त्यांनी आपल्या पतीची फिर्याद दिली.
कविता पवार या पार्लर आणि शिवणकाम करतात. त्यांचा मुलगा आदित्य याच्या अकरावीच्या प्रवेशासाठी त्यांनी पती तानाजी पवार यांच्याकडे पैशांची मागणी केली. पण पतीने पैसे देण्यास नकार दिला. तसेच तानाजीने स्वत:चे परवाना असलेले रिव्हॉल्व्हर कपाटातून बाहेर काढले. पत्नीवर ते रोखून गोळ्या घालण्याची धमकी दिली. तसेच अश्लील शिवीगाळ केली.
या प्रकारानंतर पत्नी कविता यांनी कुपवाड पोलीस ठाण्यात धाव घेऊन रात्री पतीविरुद्ध फिर्याद दिली आहे. त्यानुसार पतीविरुद्ध आर्म ॲक्ट, शिवीगाळ, दमदाटी केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. त्याच्याकडून रिव्हॉल्व्हर जप्त केली आहे. तसेच त्याला नोटीस बजावली आहे. याप्रकरणी कुपवाड पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा :
पतीचा चारित्र्यावरुन संशय, दोघांमध्ये सारखा वाद, अखेर पत्नीने जे केलं त्याने नागपूर हादरलं