घरात पैसे नव्हते, तर कुलूप कशाला लावलंत? उपजिल्हाधिकाऱ्यांकडे घरफोडी, चोरट्याचा चिठ्ठीतून सवाल
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून 2.5 तासांच्या अंतरावर असलेल्या देवासच्या सिव्हिल लाईन्स परिसरातील उपजिल्हाधिकारी त्रिलोचन गौर यांच्या अधिकृत निवासस्थानी ही घरफोडी झाली.
भोपाळ : मध्य प्रदेशात चोरीची एक विचित्र घटना समोर आली आहे. चोरट्यांनी एका उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरातच प्रवेश केला, मात्र हाती समाधानकारक मुद्देमाल न लागल्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यासाठी एक चिठ्ठी लिहिली. “जब पैसे नही थे तो लॉक नही करना था ना कलेक्टर (जर घरात पैसे नव्हते, तर तुम्ही कुलूप लावायला नको होते, कलेक्टर)” असं चोरट्याने चिठ्ठीत लिहिलं होतं.
काय आहे प्रकरण?
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून 2.5 तासांच्या अंतरावर असलेल्या देवासच्या सिव्हिल लाईन्स परिसरातील उपजिल्हाधिकारी त्रिलोचन गौर यांच्या अधिकृत निवासस्थानी ही घरफोडी झाली.
पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानाजवळ घर
या घटनेकडे पोलिसांसमोरील एक आव्हान म्हणून पाहिले जात आहे, कारण उपजिल्हाधिकाऱ्याचे घर हे एका आमदार आणि देवास उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) प्रदीप सोनी यांच्या बंगल्यांच्या मधोमध आहे, तर पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानापासून फक्त 100 मीटर अंतरावर आहे.
देवासच्या खाटेगाव तहसीलमध्ये सध्या एसडीएम म्हणून कार्यरत असलेले त्रिलोचन गौर हे गेल्या 15-20 दिवसांपासून त्यांच्या घरी नव्हते. परतल्यानंतर त्यांना घरातील सामान विखुरलेले आढळले, तर काही रोख रक्कम आणि चांदीचे दागिने गहाळ झाल्यावर त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.
चिठ्ठीत काय लिहिलंय
चोरीसोबतच चर्चा रंगली आहे त्यांच्या घरात चोरांनी सोडलेल्या चिठ्ठीची. “जब पैसे नही थे तो लॉक नही करना था ना कलेक्टर (जर घरात पैसे नव्हते, तर तुम्ही कुलूप लावायला नको होते, कलेक्टर)” असं चोरट्याने चिठ्ठीत लिहिलं होतं. या चिठ्ठीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
“खाटेगावचे एसडीएम म्हणून सध्या कार्यरत असलेल्या त्रिलोचन गौर यांच्या शासकीय निवासातून 30 हजार रुपये रोख आणि काही दागिने चोरीला गेले आहेत. घटनेची नेमकी वेळ अद्याप माहित नाही,” असं पोलीस निरीक्षक उमराव सिंह म्हणाले. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.
संबंधित बातम्या :
“सॉरी, कोरोना व्हॅक्सिन असल्याचं माहित नव्हतं” चिठ्ठी लिहून माफी, चोरलेले शेकडो डोस परत
सोन्या-चांदीची नाही, गाड्यांचीही नाही, हे लुटारु काय लुटतायत बघा? पोलीसही अवाक