खरच सेल्युट, सुमसान रस्त्यावर पोटात गोळी लागूनही 15 प्रवाशांचे जीव वाचवण्यासाठी ड्रायव्हरने जे केलं त्याला नाही तोड
सुमसान रस्त्यावरुन जीप चालवताना अचानक ड्रायव्हरच्या पोटात गोळी लागली. जीपमध्ये 15 जण होते, गोळी कुठून आली ते माहित नव्हतं, पण त्यानंतर या ड्रायव्हरने जी हिम्मत, शौर्य, धैर्य दाखवलं, त्याला तोड नाही, खरच सलाम
हीमतपूर हे तसं शांत गाव. गुरुवारी संतोष सिंह नावाच्या एका जीप चालकाने असामान्य हिम्मत, शौर्य आणि धैर्य याचा परिचय दिला. संतोष सिंह याला जीप चालवताना भयानक परिस्थितीचा सामना करावा लागला. पोटात गोळी लागल्यानंतरही संतोष सिंहने हिम्मत सोडली नाही. त्याने त्याच्या जीपमधील 15 प्रवाशांना वाऱ्यावर सोडलं नाही. त्यांच्या सुरक्षेचा विचार करुन तब्बल 5 किलोमीटरपर्यंत जीप पळवली. जेणेकरुन धोका पूर्णपणे टळावा. आज संतोष सिंह याचा आराच्या एका रुग्णालयात जीवनासाठी संघर्ष सुरु आहे.
“पोटात गोळी लागल्यामुळे त्याच्या संपूर्ण आतड्याच नुकसान झालय. त्याच्यावर एक मोठी शस्त्रक्रिया झाली. जिथे इजा झालेली त्या भागावर उपचार करण्यात आले. अजून आठवडाभर त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे” असं डॉ. विकाश सिंह यांनी सांगितलं.
SDPO काय म्हणाले?
जगदीशपूरचे SDPO राजीव चंद्र सिंह म्हणाले की, “आम्ही ही संपूर्ण घटना गांभीर्याने घेत आहोत. आम्ही फॉरेन्सिक सायन्स लॅबोरटरी आणि जिल्हा इंटेलिजन्स टीमला वैज्ञानिक तपासासाठी कामाला लावलं आहे. जिथे ही घटना घडली, त्या संपूर्ण मार्गावर आम्ही व्यवस्थित चौकशी करु. आरोपींची ओळख पटवण्यासाठी स्थानिकांची मदत घेऊ”
गाडीच्या टायरमध्ये गोळी
फक्त संतोष सिंहच्या वाहनाला टार्गेट करण्यात आलं नाही असं SDPO राजीव चंद्र सिंह म्हणाले. “ड्रायव्हरवर गोळी चालवण्याआधी तिलक विधीवरुन परतणाऱ्या ताफ्यातील अन्य दोन वाहनांवर सुद्धा हल्ला झाल्याच आमच्या तपासात समोर आलय. एका गाडीच्या टायरमध्ये पोलिसांना गोळी आढळून आली. मानसिक दृष्ट्या अस्थिर माणूस या गोळीबारामागे असू शकतो असा अंदाज आहे. आरोपीचा फोटो दाखवल्यानंतर आरोपी त्या भागातील नसल्याच स्थानिकांनी सांगितलं. पुढील तपास सुरु आहे” असं जगदीशपूरचे SDPO राजीव चंद्र सिंह म्हणाले. संतोष सिंहच्या कुटुंबाने पोलिसात तक्रार नोंदवली आहे. पण कोणावरही आरोप केलेले नाहीत. आमच कोणासोबत शत्रुत्व नाही असं त्याच्या कुटुंबाने सांगितलं.