मॅन होलमध्ये भाचीचा मृतदेह लपवला, मग ट्रकभर माती टाकली, मंदिराचा पुजारी मामा असं निर्दयी का वागला
सरुरनगरातून जेथून साई कृष्णाने आपल्या भाचीला पिकअप केले होते. तेथील 21 किमी रस्त्यातील सीसीटीव्ही तपासले तेव्हा तो तिला पिकअप करताना दिसला परंतू ड्रॉप करताना दिसला नाही...
हैदराबाद : एका मंदिराचा पुजारी असलेला 35 वर्षीय इसम पोलीसांकडे एक महिला हरविल्याची फिर्याद घेऊन गेला. पोलीसांनी प्रकरणाचे गांभीर्य पाहून लागलीच तपास करायला सुरुवात केली. महिलेचा शोध सुरु झाला जसे जसे तपासात दुवे मिळाले तसे वेगळीच कहानी समोर आली. ती ऐकून पोलीस देखील चक्रावले. एका मंदिराचा पुजारी ( Hyderabad Temple Priest ) असलेल्या या इसमाने त्या महिलेला शेवटचे पाहीलेले असल्याने पोलिसांनी त्याला चौदावे रत्न दाखविले आणि वेगळाच हादरविणारा प्रकार समोर आला.
अयागरी साई कृष्णा हा आपली भाची बेपत्ता असल्याची फिर्याद नोंदविण्यासाठी हैदराबाद पोलीस ठाण्यात गेला होता. साई कृष्णा याने पोलीसांना सांगितले की त्याची भाची कुरुगांती अप्सरा हीला दोन दिवसांपूर्वी 3 जूनच्या रात्री गाडीने शम्साबाद परिसरात ड्रॉप केले होते. परंतू त्यानंतर तिचा काहीच पत्ता लागलेला नाही. शम्साबाद येथून ती तिच्या मित्रांसोबत भद्राचलम येथे जाणार होती. परंतू त्यानंतर ती भ्रदाचलम पोहचली ना घरी हैदराबादला ..तसेच तिचा मोबाईल बंद असल्याने आपल्याला चिंता वाटत असल्याचे त्याने फिर्यादी म्हटले होते.
सीसीटीव्ही तपासले तेव्हा
पोलीसांना तक्रारदाराच्या बहीणीने म्हणजे कुरुगांती अप्सरा हीच्या आईने देखील तेच सांगितले. त्यामुळे सरुरनगरातून जेथून साई कृष्णाने आपल्या भाचीला पिकअप केले होते. तेथील 21 किमी रस्त्यातील सीसीटीव्ही तपासले तेव्हा साई कृष्णा भाचीला पिकअप करताना दिसला. परंतू शम्साबाद येथे ड्रॉप करताना कुठल्याच सीसीटीव्हीत दिसले नाही. अप्सरा हिला शेवटचे पाहणारा तोच असल्याने साई कृष्णाची चौकशी सुरु केली. तेव्हा तो जबाब वारंवार बदलत असल्याने त्याला पोलीसांनी अखेर खाकी वर्दीचा हिसका दाखवला आणि त्याने खरं सांगितले.
अनैतिक संबंधातून वाद
हैदराबादच्या सरुरनगरात पुजारी असलेल्या विवाहीत साई कृष्णा हा दोन मुलांचा बाप असून त्याचे भाची सोबत अनैतिक संबंध होते. भाचीने त्याला बायकोला घटस्फोट देऊन तिच्याशी वारंवार लग्नाचा हट्ट करीत असल्याने तिला शेवटचं समजविण्याच्या बहाण्याने साई कृष्णा तिला शम्साबाद येथील निर्जन जागी घेऊन गेला. तेथे वाद होऊन त्याने तिच्या डोक्यात दगड टाकून तिची हत्या केली. नंतर कारच्या डीक्कीत तिला ठेवून त्याने मंदिराच्या मागील मॅनहोलमध्ये टाकले. नंतर त्यावर ट्रकभर माती टाकली. तरी दुर्गंधी सुटल्याने सिमेंटने मेनहोल बुजविले. अखेर त्याने गु्न्हा कबुल केल्याने त्याला अटक केली, पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्ट मार्टेला पाठवला आहे.