दीड वर्षापासून पगार नाही, डोक्यावर कर्जाचा बोजा वाढला; अखेर त्याने एक कागद घेतला अन्…
दीड वर्षापासून मालक पगार देत नव्हता. त्यामुळे वाढते कर्ज आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह याची चिंता त्यांना लागली होती. यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.
कल्याण / सुनील जाधव : दीड वर्षापासून पगार मिळाला नाही. यामुळे डोक्यावर कर्जाचा बोजा वाढत चालाल होता. यामुळे आर्थिक विवंचनेतून शहाड बंदरपाडा येथील लाकडाच्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगाराने कारखान्यातच आपले जीवन संपवले. मालकाने मागील दिड वर्षांपासून पगार दिला नाही. यामुळे कर्ज फेडणे मुश्किल बनल्यामुळे कामगार मागील काही काळापासून वैफल्यग्रस्त होता. याच वैफल्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलले आणि जीवन संपवण्याचा मार्ग पत्करला. कैलास अहिरे असे कामगाराचे नाव असून, त्याच्या आकस्मिक मृत्यूने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
जीवन संपवण्याआधी लिहिलेल्या चिट्ठीतून समोर आले धक्कादायक सत्य
सर्वसामान्य कुटुंबातील कैलास अहिरे हे कारखान्यात प्रचंड मेहनत करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. कष्टाच्या जोरावर कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या कैलास यांना मागील दीड वर्षांपासून मात्र कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे फार कठीण बनले होते. ते ज्या ठिकाणी काम करीत होते, त्या वखारीच्या मालकाने मागील 16 महिन्यांपासून पगार दिला नाही. त्यामुळे कैलास यांना दररोजचा खर्च भागवण्यासाठी इतरांकडे हात पसरावे लागत होते. त्यातच कैलास यांच्या डोक्यावर कर्जाचा बोझा वाढत चालला होता.
एकीकडे या कर्जाचा बोजा आणि दुसरीकडे पत्नी-मुलांची चिंता अशा चक्रव्यूहात अडकल्यामुळे कैलास यांनी टोकाची भूमिका घेतली आणि जीवन संपवले. हा टोकाचा मार्ग पत्करण्याआधी लिहिलेल्या चिट्ठीत त्यांनी त्यांच्या वाट्याला आलेली व्यथा मांडली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस पुढील तपास करत आहेत. तसेच गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.