रेल्वे पोलीस भरतीच्या नावाखाली तरुणांना लाखोंचा गंडा, तिघांविरोधात गुन्हा दाखल
रेल्वे पोलिसा नोकरीचे आमिष दाखवत ओळखीच्याच तिघा इसमांनी दोन तरुणांना 18 लाख रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी गांधीनगर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
कोल्हापूर / भूषण पाटील : ओळखीचा फायदा घेत रेल्वे पोलिसात नोकरी लावतो सांगत दोघा तरुणांची 18 लाखांची फसवणूक केल्याची घटना कोल्हापुरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी सांगलीतील तिघांवर कोल्हापूरच्या गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदय निळकंठ, गोविंद गुरव आणि नवनाथ गुरव अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघा आरोपींची नावे आहेत. श्रीधर शिवाजी शिंदे आणि दीपक जयसिंग अंगज अशी फसवणूक झालेल्या तरुणांची नावे आहेत. आरोपींनी आणखी किती जणांना नोकरीचे आमिष दाखवून गंडा घातला आहे, याचा पोलीस तपास करत आहेत.
आरोपी आणि पीडित एकमेकांना ओळखत होते
करवीर तालुक्यातील उचगाव येथील तरुणांना फसवल्याची घटना घडली आहे. आरोपी उदय निळकंठ आधी उचगाव येथे राहण्यास होता. यावेळी त्याची दीपकचे वडील जयसिंग अंगज यांच्याशी ओळख झाली. यानंतर त्याने गोविंद गुरव आणि नवनाथ गुरव यांच्याशी आरोपींची ओळख करुन दिली. यानंतर सर्वांचे एकमेकांकडे येणे-जाणे होते.
नोकरीचे आमिष दाखवत 18 लाख उकळले
याच ओळखीचा फायदा घेत तिघा आरोपींनी दीपक अंगज आणि त्याचा मित्र श्रीधर शिंदे यांना रेल्वे पोलिसात नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार दोघांनी जयसिंग अंगज यांनी 10 लाख रुपये आणि श्रीधर शिंदे याने 8 लाख रुपये आरोपींना दिले. मात्र दोन वर्ष उलटली तरी नोकरी लागली नाही. याबाबत आरोपींकडे वारंवार पाठपुरावा करुनही पैसेही परत मिळाले नाही आणि नोकरीही मिळाली नाही.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणांनी गांधीनगर पोलीस ठाणे गाठत आरोपींविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघा आरोपींना सांगली जिल्ह्यातून अटक केली आहे. पोलीस आरोपींची अधिक चौकशी करत आहेत.