कोर्टाच्या आवारात पोलिसांना धक्काबुक्की, वकिलांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ; नाशिकमध्ये पार्किंगच्या जागेवरून घातली हुज्जत
नाशिकमध्ये कोर्टाच्या आवारातच चक्क पोलिस आणि वकिलांना धक्काबुक्की करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे.
नाशिकः नाशिकमध्ये कोर्टाच्या आवारातच चक्क पोलिस आणि वकिलांना धक्काबुक्की करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. जिल्हा व सत्र न्यायालयात वाहनाची व्यवस्थित पार्किंग करायला सांगितल्यामुळे संशयिताने महिला नातेवाईकांसह आकांडतांडव केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत होते. कोर्टाच्या प्रवेशद्वाराजवळ पोलीस कर्मचारी गंगाधर पगारे, योगेश बिडगर, वैभव पगार, तुषार डरांगे कर्तव्यावर होते. पोलीस कर्मचाऱ्यांनी न्यायालयाच्या आवारात आलेल्या नागरिकांना दुचाकी व्यवस्थित लावा, असे आवाहन केले. तसेच नेहमीप्रमाणे गर्दी करू नका, असे सांगितले. अब्दुल लतिफ कोकणी यालाही पोलिसांनी दुचाकी व्यवस्थित पार्क करा, असे सांगतिले. हे ऐकताच कोकणीचा पारा चढला. तुमचे सारखे तेच सुरू असते म्हणत त्याने पोलिसांशी हुज्जत घालायला सुरुवात केली. कोकणीसोबत आलेल्या इतरांनीही पोलिसांशी वाद घातला. त्यामुळे बराच काळ वातावरण गरम झाले. त्यातूनच वाद वाढत गेला. एकमेकांना शिवीगाळ करण्यापर्यंत प्रकरण गेले. त्यामुळे गर्दी जमा झाली. अनेकांनी मोबाइलमध्ये व्हिडिओमध्ये शुटींग सुरू केले. तेव्हा संशयिताने हुज्जत घालत पोलिसांना धक्काबुक्की केली. पोलिसांचा गणवेश फाडला. हा प्रकार पाहता अनेक वकिलांनी भांडण सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र, संशयिताने वकिलांनाही शिवीगाळ करायला सुरुवात केली. शेवटी पोलीस कर्मचारी कैलास जाधव यांनी याप्रकरणी संशयित अब्दुल लतिफ कोकणी, अन्वर हुसेन यासिन कोकणी आणि रुबिना जाबीद आबुजी यांच्याविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांवर हल्ल्याचे प्रकार जिल्हा व सत्र न्यायालयात पोलिसांचीच सुरक्षा वाऱ्यावर आहेत. कारण येथे पोलिसांवरच हल्ला होण्याचे प्रकार पूर्वी घडले आहेत. न्यायालय परिसरात अनेक पक्षकार येतात आणि गर्दी करतात. पोलीस त्यांना वाहने व्यवस्थित लावा, गर्दी करू नका, असे आवाहन करतात. मात्र, पार्किंग किंवा इतर कारणावरून येथे पोलीस आणि पक्षकारांमध्ये नेहमीच वादावादीचे प्रकार घडतात. वकिलांनाही शिवीगाळ केली जाते. त्यामुळे वकील आणि पोलिसांची सुरक्षाच वाऱ्यावर असल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी वकील आणि पोलिसांमध्ये तीव्र संताप आहे.
इतर बातम्याः
Airport Look | नेहमीप्रमाणेच कूल आणि फंकी अवतारात विमानतळावर दिसला रणवीर सिंह, पाहा फोटो…#RanveerSingh | #AirportLook | #Entertainment https://t.co/hyECjDUcNT
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 13, 2021