मालेगावच्या तरूणांमध्ये कुत्ता गोळीची झिंग कायम; नाशिक ग्रामीण पोलीसांची मोठी कारवाई, कुत्ता गोळीचा फंडा आहे तरी काय ?
नाशिक शहरासह मालेगाव शहरात कुत्ता गोळीची झिंग कायम आहे. ग्रामीण पोलीसांनी नुकतीच एक मोठी कारवाई केली आहे. यामध्ये कुत्ता गोळीच्या नशेपासून दूर करण्यासाठी जनजागृती मोहीम मुस्लिम संघटना आणि नाशिक पोलीसांनी हाती घेतली आहे.
नाशिक : दारूची नशा महागडी वाटत असल्याने तरुणाईमध्ये सध्या कुत्ता गोळी चर्चेत आहेत. मालेगाव शहरानंतर नाशिक शहरातही कुत्ता गोळीचे सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. दारूच्या तुलनेत काही पैशांना मिळणारी गोळी नशेसाठी तरुणाई खरेदी करीत आहे. विशेष म्हणजे मेडिकल मध्ये सर्रासपणे मिळणारी कुत्ता गोळी चिंतेची बाब ठरत आहे. ग्रामीण पोलीसांनी नववर्षात तीन गुन्हे दाखल केले आहे. त्यामुळे तरुणाईमधील कुत्ता गोळीची झिंग काही कमी झालेली दिसून येत नाही. मालेगाव शहरात कुत्ता गोळी सर्रासपणे विक्री केली जात असल्याचे यापूर्वीच्या कारवाईवरुन स्पष्ट झाले होते. पोलीसांच्या कारवाईनंतरही वारंवार कुत्ता गोळीची विक्री केली जात असल्याचे दिसून आले आहे. एक ते दोन रुपयांना मिळणारी गोळी दारूच्या तुलनेत स्वस्त आहे. त्यामुळे तरुणाई ही गोळी खरेदी करून नशा करत असल्याचे लक्षात आल्याने मुस्लिम संघटना आणि पोलीस दलाने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.
मागील आठवड्यात मालेगाव शहरात न्यू मदनीनगर भागात अवैधरित्या कुत्ता गोळी विक्री करणाऱ्या रईस शहार उर्फ शहा याच्यावर छापा टाकला होता.
रईस याची झाडाझडती घेतल्यानंतर 10 हजार रुपयांहून अधिक किमतीच्या कुत्ता गोळीच्या स्ट्रिप्स आढळून आल्या आहे, त्या ग्रामीण पोलीसांनी जप्त केल्या आहे.
मालेगावमध्ये तीन ठिकाणी कुत्ता गोळीच्या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून केलेल्या कारवाई वरुन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
तरुणाई कुत्ता गोळीच्या नशेच्या आहारी जात असल्याचे लक्षात आल्याने मुस्लिम संघटना आणि पोलीस दलाने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.
याशिवाय ग्रामीण पोलीसांनी सुरू केलेल्या 6262256363 या हेल्पलाइन नंबरवर अवैध प्रकारचे व्यवसाय केले जात असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले जात आहे.
नाशिक ग्रामीण पोलीसांनी तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाईल असेही जाहिर केले आहे, त्यामुळे अवैध धंद्याच्या संदर्भानुसार कुत्ता गोळीच्या संदर्भातही कारवाई केली जाणार आहे.