आधार आश्रम लैंगिक अत्याचार प्रकरणाची सरकारने घेतली दखल, आठवड्याभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश
नाशिकच्या म्हसरूळ शिवारातील मानेनगर परिसरात ज्ञानदिप आश्रमातील एका अल्पवयीन मुलीने संस्थेच्या संचालकानेच लैंगिक अत्याचार केल्याची आपबीती आई-वडिलांना सांगितली होती.
नाशिक : नाशिकच्या म्हसरूळ येथील द किंग फाउंडेशन संचालित ज्ञानदिप आधार आश्रमातील लैंगिक अत्याचार प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. आधार आश्रमात सहा अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्या प्रकरणी राज्याचे महिला आणि बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. चौकशी समिती स्थापन करून सात दिवसाच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचा इशारा दिला आहे. खरंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडल्यानंतर उशिरा जाग आलेल्या महिला आणि बालविकास विभाग याबाबत तातडीने काय कारवाई करणार हा देखील प्रश्नच आहे. मात्र, नाशिक येथील हा प्रकार धक्कादायक असून त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राजाच्या आधार आश्रमांचे ऑडिट करावे अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली होती. मात्र, प्रकरण पाहता तांत्रिक दृष्ट्या हाताळले जात असल्याने या प्रकरणात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.
नाशिकच्या म्हसरूळ शिवारातील मानेनगर परिसरात ज्ञानदिप आश्रमातील एका अल्पवयीन मुलीने संस्थेच्या संचालकानेच लैंगिक अत्याचार केल्याची आपबीती आई वडिलांना सांगितली होती.
आई-वडिलांनी पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिल्यानंतर म्हसरूळ पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता, त्यावरून संपूर्ण शहरासह खळबळ उडाली होती.
त्यातच काही दिवसांपूर्वी आधारतीर्थ आश्रमात चार वर्षीय मुलाचा गळा आवळून खून केल्याची बाब समोर आल्याने आश्रमाच्या सुरक्षेचा मुद्दा समोर आला होता.
त्यानंतर धक्कादायक आणि तितकीच संतापजनक बाब समोर आल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून संशयित आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी होऊ लागली आहे.
आधार आश्रमातील आणखी पाच मुलींवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला असून एकूण सहा गुन्हे हर्षल मोरे याच्यावर दाखल झाले आहे.
त्याप्रकरणी आता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्याने येत्या काळात काय कारवाई होते हे बघणं महत्वाचे ठरणार आहे.