Dombivli Crime : “तुमचे कष्ट दूर करतो ” सांगत वृद्धाला लुटलं, साधूच्या वेषातील भामट्यांना कसं पकडलं ?
देशभरातील विविध राज्यात आणि शहरात साधूबाबांच्या वेषात वयोवृद्धांना लुटणाऱ्या तीन भामट्यांना सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी बेड्या ठोकल्या. लुटलेले दागिने आणि एका महागडी कारही पोलिसांनी भामट्या चोरांकडून जप्त केली.

साधूच्या वेशात येऊन लोकांना गंडा घालणाऱ्या आणि त्यांना लुटणाऱ्या भामट्यांच्या एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करत चोरांना बेड्या ठोकण्यात डोंबिवली मानपाडा पोलिसांना यश मिळालं आहे. राहुल भाटी, आशीष मदारी, लखन निकम अशी तीन भामट्यांची नावे आहेत. ” तुमचे कष्ट दूर करतो “असे सांगत डोंबिवलीतील एका 75 वर्षीय वृद्ध इसमाला बोलण्यात गुंतवून त्याची सोन्याची चेन आणि अंगठी घेऊन हे भामटे पसार झाले होते. मात्र सीसीटीव्हीने या भामट्यांचे बिंग फोडले. मानपाडा पोलिसांनी या तिन्ही आरोपींना बेड्या तर ठोकल्याच पण त्यांच्याकडून लुटीचे दागिने आणि एक महागडी कारही जप्त केली.
महाराष्ट्र्च नव्हे अन्य राज्यातही नागरिकांची केली लूट
मिळालेल्या माहितीनुसार, या तिन्ही चोरांनी फक्त डोंबिवली तसेच महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात आणि देशातील अन्य शहरातही चलाखी करत नागरिकांना लुटले होते. या तिघांनी अशाप्रकारे आणखी काही नागरिकांची फसवणूक केल्याचा संशय मानपाडा पोलिसांना असून याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
नेमकं काय घडलं ?
डोंबिवली पूर्वेकडील खोली पलावा येथे राहणारे माधव जोशी हे भाजी घेऊन काल सकाळच्या सुमारास घराकडे परत जात होते. याच वेळेस एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून तिघे जण आले , त्यापैकी दोघे साधूच्या वेशात होते. त्यामधील एकाने आपण साधू असल्याची बतावणी करून जोशी यांना थांबवले आणि “तुमचे कष्ट दूर करतो” असे सांगत त्यांना बोलण्यात गुंतवले. तेवढ्या वेळात हातचलाखी करत त्या चोरांनी जोशी यांच्या गळ्यातली चेन व हातातली अंगठी काढून घेतली. त्यानंतर जोशी यांना काही समजण्याच्या आतच हे भामटे पसार झाले.
या प्रकरणी माधव जोशी यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली . डीसीपी अतुल झेंडे, एसीपी सुहास हेमाडे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादवाने पोलीस निरीक्षक राम चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलिसांच्या पथकाने या भामट्यांचा शोध सुरू केला .मानपाडा पोलिसांनी तात्काळ आजूबाजूच्या परिसरातल्या सीसीटीव्ही तपासले गाडीचा नंबर निष्पन्न करून त्याआधारे गाडीचा शोध सुरू केला. हे तिघे भामटे हे भिवंडी येथील कोन गावात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कोनगाव परिसरात सापळा रचत या तिघांनाही अटक केली.
राहुल मदारी, आशिष मदारी लखन निकम अशी या तिघांची नावे आहेत . राहुल व आशिष हे मूळचे गुजरात येथील रहिवासी आहेत . मिळालेल्या माहितीनुसार, राहुल मदारी हा साधूची वेशभूषा करायचा तर लखन निकम हा गाडी चालवत होता. एवढंच नव्हे तर आशिष हा साधूचा शिष्य असल्याचे बतावणी करायचा . राहुल मदारी विरोधात याआधी देखील अशाच प्रकारच्या गुन्ह्याची नोंद आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.