जॅकलिन फर्नांडिसला सुकेशच्या सर्व भानगडी माहीती होत्या, तरीही केला पैशांचा वापर, ईडीचे कोर्टात प्रतिज्ञापत्र
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्या अडचणी वाढल्या आहेत. 200 कोटी रुपयांच्या मनी लॉण्ड्रींग प्रकरणात जॅकलिनने आपल्या महाठग सुकेश चंद्रशेखरने फसविल्याचा दावा केला होता. परंतू ईडीने या प्रकरणात कोर्टात दाखल प्रतिज्ञापत्रात आरोपी सुकेश चंद्रशेखर याची गुन्हेपार्श्वभूमी तिला आधीच माहीती होती. तरीही तिने त्याचा पैशांचा वापर स्वत:साठी आणि कुटुंबियांसाठी केल्याचा ठपका ठेवला आहे.
नवी दिल्ली | 31 जानेवारी 2024 : बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ झाली आहे. महाठग सुकेश चंद्रशेखर याच्याकडून महागड्या गिफ्ट स्वीकारल्या प्रकरणात तिच्यावर नवीन आरोप ईडीने केले आहेत. 200 कोटी रुपयांच्या मनी लॉण्ड्रींग प्रकरणातील आरोपी असलेल्या जॅकलिनने महाठग सुकेश चंद्रशेखरची सर्व माहीती असूनही त्याचे पैसे स्वीकारुन त्याचा स्वत:साठी वापर केल्याचा आरोप ईडीने कोर्टात केला आहे. जॅकलिन फर्नांडिस हीने केलेल्या याचिकेवर ईडीने कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ईडीने हा गंभीर आरोप केला आहे.
सुकेश चंद्रशेखर याच्यावर दाखल मनी लॉण्ड्रींग प्रकरणात आपल्याविरोधात दाखल गुन्हा रद्द करण्यात यावा यासाठी जॅकलिन हीने कोर्टात याचिका केली आहे. न्यायमूर्ती मनोज कुमार ओहरी यांच्या समोर हे प्रकरण सुनावणीला आले होते. यावेळी ई़डीने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राला उत्तर देण्यासाठी जॅकलीन हीच्या वकीलांनी कोर्टाकडे वेळ मागितला आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 एप्रिल रोजी ठेवली आहे.
मोबाईलमधील डाटा डिलीट केला
ईडीने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की जॅकलीनने सुकेशसोबतच्या केलेल्या पैशांच्या व्यवहाराबाबत सत्य कधीच सांगितले नाही आणि पुरावे पुढे येईपर्यंत तथ्य लपवून ठेवले. जॅकलीन हीने आजपर्यंत सत्य दाबून ठेवले आहे. तिने सुकेश चंद्रशेखर याला अटक झाल्यानंतर आपल्या मोबाईल फोनचा सर्व डाटा डिलिट केला. ज्यामुळे सर्व पुराव्यांना मिटविण्याचा तिचा प्रयत्न उघड झाला आहे. तिने आपल्या सहकाऱ्यांनाही पुरावे नष्ट करायला सांगितले. यावरुन हे स्पष्ट होते की सुकेशच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दल तिला सर्वकाही ज्ञात होते आणि ती त्याचा फायदा उठवत होती असे ईडीने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
सुकेशच्या भानगडी माहीती होत्या…
अभिनेत्री जॅकलिन हीने आधी आपली कृत्ये लपवित दावा केला होता तिला चंद्रशेखरने फसविले आहे. परंतू तपासात तिने या प्रकरणात आपण पिडीत आहोत याचे पुरावे देऊ शकली नसल्याचे ईडीने याआधी म्हटले होते. या प्रकरणात सुकेशच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची तिला पुरेपुर कल्पना होती. तरी ती स्वत:साठी स्वत:च्या कुटुंबियांसाठी गुन्ह्यातील पैशांचा वापर करीत होती असे उघड झाले आहे.