तिघे आले आणि थेट चाकू, चॉपरने हल्ला… शिंदे गटाच्या माजी उपसरपंचाच्या हत्येनं जळगाव हादरलं
जळगाव तालुक्यातील कानसवाडा गावाचे माजी उपसरपंचाचा निर्घृण खून ! चाकू आणि चॉपरने त्यांच्यावर वार चढवल्याने ते जागीच कोसळले अशी माहिती समोर आली आहे.

बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने संपूर्ण राज्यातलं वातावरण अजूनही तापलेलं आहे. त्यावरून गदरोळ सुरू असतानाच आता जळगावमध्येही एका उपसरपंचाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे पक्षाच्या माजी उपसरपंचाच्या हत्येनं जळगाव हादरलं आहे. युवराज सोपान कोळी असे मयत उपसरपंचाचे नाव आहे. त्यामुळे प्रचंड गोंधळाचं वातावरण असून कोळी यांच्या कुटुंबियांवर तर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
गावातीलच तिघांनी आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास युवराज कोळी यांच्यावर हल्ला चढवला. खुनाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारेकऱ्यांच्या शोधासाठी पोलिसांनी पथक रवाना केल्याची माहिती समोर आली आहे.
तिघांनी चढवला थेट हल्ला
जळगाव येथील कानसवाडा गावाचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांचा निर्घृण खून झाल्याची घटना आज सकाळी घडली. या घटनेनंतर परिसरात प्रचंड खडबड उडाली आहे. युवराज कोळी हे शिवसेना शिंदे गटाचे माजी उपसरपंच असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. गावातील तिघांनी आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास युवराज कोळी यांच्यावर हल्ला चढविला. चाकू आणि चॉपरने त्यांच्यावर वार केल्याने कोळी हे प्रचंड जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
यामुळे गावात अतिश खळबळ माजली आहे. जळगाव शासकीय व वैद्यकीय महाविद्यालयात युवराज कोळी यांचा मृतदेह आणण्यात आला असून नातेवाईकांच्या प्रचंड आक्रोशाने वातावरण अगदी सुन्न झालं आहे. कानसवाडा गावासह जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण असून खुनाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. तीनही मारेकऱ्यांचा कसून शोध सुरू असून पोलिसांनी त्यांच्या शोधार्थ पथकही रवाना केलं आहे.