जळगावच्या माजी नगरसेवकाच्या हत्येचं पुणे कनेक्शन? पोलिसांची मोठी कारवाई
चाळीसगावच्या भाजपच्या माजी नगरसेवकाच्या हत्या प्रकरणी जळगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जळगाव पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना पुण्यातून अटक केली आहे. पोलिसांकडून आता आरोपींची चौकशी केली जात आहे.
किशोर पाटील, Tv9 प्रतिनिधी, जळगाव | 13 फेब्रुवारी 2024 : जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाची भर दिवसा चार ते पाच तरुणांना मिळून हत्या केली होती. आरोपी तरुणांनी दिवसाढवळ्या माजी नगरसेवकाच्या कार्यालयात घुसून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. आरोपी सिनेस्टाईल एका कारने आले होते. ते पाच जण होते. पाचही जण हातात पिस्तूल घेऊन गाडीच्या खाली उतरले. ते माजी नगरसेवक बाळू मोरे यांच्या कार्यालयात शिरले. तिथे बाळू मोरे हे एकटेच होते. त्यांनी बाळू मोरे यांच्यावर बेछूट गोळीबार केला. त्यानंतर ते तिथून पळून गेले. संबंधित घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. अखेर या हत्येचं पुणे कनेक्शन समोर आलं आहे. पोलिसांनी या हत्येप्रकरणी पुण्यातील दोन आरोपींना अटक केली आहे.
भाजपचे माजी नगरसेवक बाळू मोरे यांच्या खुनातील दोन आरोपींना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी पुण्याच्या लोणीकंद परिसरातून अटक केली आहे. जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. सचिन सोमनाथ गायकवाड आणि अनिस ऊर्फ नव्वा शेख शरिफ शेख अशी अटकेतील दोन्ही आरोपींची नावे आहेत. पोलीस आरोपींची आता कसून चौकशी करत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
जळगावच्या चाळीसगाव शहरातील सिंधी कॉलनी येथील भाजपचे माजी नगरसेवक बाळू मोरे यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं होतं. पण त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात 5 हल्लेखोर आणि कट रचनारे 2 अशा एकूण 7 हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील सर्व आरोपी हे फरार होते. या गुन्ह्यात दोन आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पुण्यातून अटक केली आहे.
पुण्यातील लोणीकंद परिसरातून सचिन सोमनाथ गायकवाड (वय २३, रा. घाटरोड, चाळीसगाव ता. चाळीसगा, जि.जळगाव) अनिस ऊर्फ नव्वा शेख शरिफ शेख (वय २३, रा. हुडको चाळीसगाव ता. चाळीसगाव जि.जळगाव) यांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने शिताफिने ताब्यात घेतले. दोघांना पुढील कारवाईसाठी चाळीसगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.