आरोपीचे 3 वर्षात 6 गंभीर गुन्हे, कल्याणच्या पाशवी घटनेतील धक्कादायक Inside Story
आरोपी विशाल गवळीवर गेल्या 3 वर्षात 6 गुन्हे दाखल आहेत. ज्यात 2 अल्पवयीन मुलींचा विनयभंग, 1 जबरी चोरी, मुलावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा, मारहाण आणि आता अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन अत्याचार आणि हत्येच्या गुन्ह्याचा समावेश आहे.
महाराष्ट्रातली गुन्हेगारी किती वेगानं वाढतेय हे सांगण्यासाठी कल्याणमधली घटना पुरेशी आहे. सराईत गुन्हेगार तुरुंगातून जामीन मिळवतो काय, आणि बाहेर येवून पुन्हा अल्वपयीन मुलींना शिकार करतो काय? जो प्रकार अल्पवयीन मुलीसोबत घडला ते ऐकून कोणताही हृदय असलेला माणूस अस्वस्थ होईल. आरोपी विशाल गवळीच्या पत्नीनं दिलेल्या जबाबानुसार, घटना 22 डिसेंबरला घडली. कल्याणच्या चक्कीनाका भागातून संध्याकाळी चारच्या सुमारास एक 13 वर्षीय मुलगी घराबाहेर पडली. आरोपी विशाल गवळीने तिचं अपहरण करुन स्वतःच्या घरी आणलं. तिच्यासोबक गैरकृत्य करुन नंतर तिची हत्या केली. बँकेत काम करणारी आरोपीची पत्नी साक्षी गवळी संध्याकाळी 7 वाजता घरी परतली. आरोपीने घडलेला सारा प्रकार आपल्या पत्नीला सांगितला.
यानंतर दोघांनी मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याचा प्लॅन आखला. आधी दोघांनी मिळून घरातले पडलेले रक्ताचे डाग पुसून टाकले. एका मोठ्या पिशवीत अल्पवयीन मुलीचा मृतदेह पॅक केला. साडे आठच्या दरम्यान मित्राची रिक्षा घराजवळ बोलावली. रिक्षात टाकून मृतदेह कल्याणजवळच्या बापगावात फेकून दिला. घरी परतताना आरोपीने आधारवाडी चौकातून दारु विकत घेतली. तिथूनच तो आपल्या बायकोच्या गावी म्हणजे शेगावला निघून गेला.
आरोपीच्या पत्नीच्या कबुली जबाबातून गुन्हा उघड
नोकरीमुळे बायको मात्र कल्याणमधल्या घरी परतली. तपासावेळी आरोपीच्या घराबाहेर काही रक्ताचे डाग सापडल्यामुळे पोलिसांनी आरोपीच्या पत्नीला ताब्यात घेतलं. तिनेच वर घडलेला सारा घटनाक्रम पोलिसांना सांगितला. पोलीस आरोपी विशाल गवळीच्या शोधात शेगावला पोहोचली. तिथे दाढी करुन आरोपी वेशांतरास्थितीत राहणार होता. पण त्याआधीच त्याच्या मुसक्या आवळल्या गेल्या. धक्कादायक म्हणजे याच विशाल गवळीवर गेल्या दोन ते तीन वर्षात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यात तो जामिनावर बाहेर होता.
आरोपी विशाल गवळीवर 3 वर्षांत 6 गंभीर गुन्हे
आरोपी विशाल गवळीला साधारण 12 महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीच्या बलात्काराच्या प्रयत्नात अटक झाली होती. क्लासवरुन परतणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा स्कुटीने पाठलाग करुन भररस्त्यात तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न विशाल गवळीने केला होता. त्यावेळी अटकेत घेतल्यानंतर पोलीस कोठडीत असतानाही मुजोर आरोपीने विक्टरीचं साईन दाखवून आपलं कायदाही काही करु शकत असं तो सांगू पाहत होता. त्याच व्यक्तीने आता ३ दिवसांपूर्वी पुन्हा एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार केले, आणि तिची निर्घृणपणे हत्या करुन एका कब्रस्थानाजवळ तिचा मृतदेह फेकून दिला.
आरोपी विशाल गवळीवर गेल्या 3 वर्षात 6 गुन्हे दाखल आहेत. ज्यात 2 अल्पवयीन मुलींचा विनयभंग, 1 जबरी चोरी, मुलावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा, मारहाण आणि आता अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन अत्याचार आणि हत्येच्या गुन्ह्याचा समावेश आहे. एका कोवळ्या पोरीसोबत गैरकृत्यानंतर आरोपी तिची हत्या करतो. मृतदेह फेकून दिल्यानंतर दारु पितो. तरीही आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाची, अपराधीपणाची पुसटशी रेषही दिसत नाही. त्याऐवजी आपण पुन्हा तुरुंगातून बाहेर पडू या आत्मविश्वासातून आलेला मुजोरपणा ठळकपणे दिसतो. त्यामुळे कल्याण पोलिसांपुढे आरोपीला फक्त बेड्या ठोकणं नव्हे तर अशा लोकांच्या चेहऱ्यावरचा हा मुजोरपणा जिरवण्याचं आव्हान आहे.